‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ प्रदर्शित झाल्यावर रणवीर-अनुष्कापेक्षा जास्त चर्चा रंगली ती प्रियांका चोप्राच्या बहिणीची! पण, वर्षभरातच प्रियांकाची चुलत बहीण म्हणून मिळालेली ओळख तिने पुसून टाकली आणि बॉलीवूडमध्ये स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आता संपूर्ण बॉलीवूड तिला बबली गर्ल म्हणून ओळखतं. ‘इशकजादे’मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारी बबली गर्ल म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री परिणीती चोप्रा आज ३५ वा वाढदिवस. अर्थात, ‘इशकजादे’च्या यशानंतर परिणीतीच्या वाट्याला फारसं यश आलं नाही. मधल्या काळात तिच्या अनेक सिनेमांवर फ्लॉपची पाटी लागली, अनेकांनी तिला वजनावरुन ट्रोलदेखील केलं. अशा सगळ्या अडचणींवर मात करत आता परिणीती पुन्हा नव्याने उभी राहू पाहतेय.
हेही वाचा : दिवाळीच्या सुट्टीत ‘झिम्मा २’
परिणीतीचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी हरियाणाच्या अंबाला येथे झाला. शाळेत अत्यंत हुशार असलेल्या परिणीतीने फार पूर्वीपासून अभ्यासावर लक्ष केंद्रित करून उत्तम करिअर करायचं हे मनाशी पक्क ठरवलं होतं. पण, नशिबाचं चक्र असं काही फिरलं की, लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या परीने भारतात येऊन चित्रपट क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. आज परिणीतीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलचे माहित नसलेले किस्से…
नोकरीनिमित्त लंडन झेप…
परिणीती चोप्रा लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार होती. १२ वी मध्ये चांगले टक्के मिळाल्याने उच्च शिक्षण आणि भविष्यात नोकरीसाठी अभिनेत्रीने लंडनची वाट धरली. परिणीतीने अर्थशास्त्र, व्यवसाय आणि वित्त या विषयांमध्ये पदवी मिळवलेली आहे. २००९ मध्ये आर्थिक मंदीच्या काळात परिणीतीला तिची लंडनमधील नोकरी गमवावी लागली. त्याठिकाणी ती गुंतवणूक व्यवस्थापक म्हणून काम करत होती. नोकरी गमावल्यावर तिने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यावर उच्चशिक्षित असूनही अभिनेत्रीला नोकरी मिळू शकली नाही. त्यानंतर एका स्टुडिओमध्ये कमी पगारामध्ये तिने इंटर्नशीप केली. कालांतराने परिणीतीने यशराज बॅनरमध्ये पीआर म्हणून नोकरी करण्यास सुरूवात केली.
हेही वाचा : अभिनेता स्वप्निल जोशी निर्मात्याच्या भूमिकेत
राणी मुखर्जीची असिस्टंट म्हणून काम
यशराज बॅनरमध्ये परिणीतीने राणी मुखर्जीची असिस्टंट म्हणून काम केलं आहे. यशराजमधील नोकरीबद्दल परिणीती सांगते, “यशराजमध्ये काम करत असताना सर्वप्रथम मला राणी मुखर्जीने बॉलीवूड अभिनेत्री म्हणून काम करण्याचा सल्ला दिला होता. त्याआधी चित्रपटांमध्ये काम करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती.” चेहऱ्यावर मेकअप करणं, हिरोईन होणं हे स्वप्न परिणीतीचं कधीच नव्हतं. परंतु, प्रियांका चोप्राला ‘सात खून माफ’ या चित्रपटासाठी तयार होताना पाहिल्यावर परिणीतीच्या मनात अभिनयाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. यानंतर लगेच ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेऊन परिणीतीने अभिनय क्षेत्राचा अभ्यास केला.
‘अशी’ होती परिणीतीची पहिली ऑडिशन
परिणीतीने अभिनयाचे धडे गिरवल्यावर एके दिवशी दिग्दर्शक मनीष शर्माने अभिनेत्रीला शानू शर्माच्या घरी ऑडिशनसाठी पाठवलं. त्या काळात परिणीती आणि मनीष शर्मा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शानू शर्माने परिणीतीला करीना कपूरच्या ‘जब वी मेट’ मधील एक सीन रिक्रिएट करायला सांगितला. याबद्दल परिणीती सांगते, “मला अजिबात कल्पना नव्हती…शानूजींनी घेतलेल्या ऑडिशनचं पुढे काय होईल? पण, माझ्या ऑडिशनच्या क्लिप्स आदित्य चोप्राने पाहिल्या. त्यानंतर मला तीन चित्रपटांसाठी निश्चित करण्यात आलं. अनेकांनी मनीष शर्माबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याने मला हा फायदा झाला अशा अफवा उठवल्या…पण, आदित्य चोप्रा आणि मनीष शर्मा या दोन व्यक्तींबद्दल माझ्या मनात कायम आदर राहिल. त्यांच्यामुळे मला एका नवीन आयुष्य मिळालं.”
हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी इन्स्टाग्रामवर कोणाला फॉलो का करत नाहीत? कारण सांगत म्हणाले, “मी….”
‘इशकजादे’मुळे रातोरात नशीब उजळलं पण…
परिणीती चोप्रा आणि अर्जून कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘इशकजादे’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटामुळे परिणीतीला सगळेजण प्रियांका चोप्राची बहीण म्हणून ओळखत होते. पण, ‘इशकजादे’च्या यशामुळे अभिनेत्रीचं नशीब रातोरात उजळलं. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने कोटींचा गल्ला जमावला होता. परिणीतीच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं पण, हा आनंद फार टिकला नाही कारण, भविष्यात ‘इशकजादे’प्रमाणे तिच्या अन्य कोणत्याही चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘इशकजादे’चं कथानक हिंदू-मुस्लिम प्रेमकहाणीवर आधारित होतं. परिणीतीने यामध्ये झोया कुरेशी, तर अर्जुनने परमा चौहानची व्यक्तिरेखा साकारली होती.
अभियनासह जोपासली गायनाची आवड
परिणीती चोप्राला अभिनयाशिवाय गायनाचीदेखील आवड आहे. लहानपणी तिने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं होतं. बॉलीवूडच्या दोन चित्रपटांमध्ये तिला पार्श्वगायनाची संधी मिळाली. ‘केसरी’ चित्रपटामधील ‘तेरी मिट्टी’चं फिमेल व्हर्जन परिणीतीने गायलं आहे. याशिवाय ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटातील ‘माना के हम यार नही’ हे गाणं देखील परिणीतीच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
२०१५ मध्ये कमी केलं तब्बल २८ किलो वजन
परिणीती चोप्रा इतर अभिनेत्रींच्या तुलनेत थोडीफार गुबगुबीत होती. त्यामुळे सोशल मीडियावर तिला अनेकदा वजनावरून ट्रोल केलं जायचं. परिणीतीला आधी जंक फूड व पिझ्झा खायला प्रचंड आवडायचं. अखेर वजन नियंत्रणात आणण्यासाठी परिणीतीने पिझ्झा खाणं सोडून दिलं आणि योग्य व्यायाम, उत्तम आहाराच्या जोरावर २०१५ मध्ये तब्बल २८ किलो वजन कमी केलं.
परिणीती ते राजनीती
परीच्या बॉलीवूड करिअरमध्ये अनेक चढ-उतार सुरू असताना अचानक तिच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली ते म्हणजे आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा. नुकताच दोघांचा विवाहसोहळा उदयपूरमध्ये पार पडला. या शाही सोहळ्याला राजकीय आणि कलाक्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. लंडनला कॉलेजमध्ये असताना परिणीती आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट झाली होती. परिणीतीने ‘मँचेस्टर बिझनेस स्कूल’ आणि राघव चड्ढा यांनी लं’डन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’मधून शिक्षण पूर्ण केलंय. पण, दोघांच्या प्रेम कहाणीला खऱ्या अर्थाने सुरूवात २०२२ पासून झाली. परिणीतीच्या ‘चमकीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. राघव चड्ढांना भेटण्यापूर्वी परिणीतीचं राजकारण्यांविषयी फारच वेगळं मत होतं. “मला कोणत्याच राजकारण्याशी लग्न करायचं नाही. बरेच चांगले पर्याय आहेत पण, राजकारण्याशी लग्न अजिबात नाही करणार”, असं परिणीतीने एका मुलाखतीत ठामपणे सांगितलं होतं. परिणीतीच्या लग्नानंतर तिचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
परिणीतीने तिच्या आजवरच्या १२ वर्षांच्या करिअरमध्ये ‘मेरी प्यारी बिंदू’, ‘हंसी तो फंसी’, ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’, ‘नमस्ते लंडन’, ‘केसरी’, ‘जबरिया जोडी’, ‘इशकजादे’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. १२ वर्षांचा तगडा अनुभव घेतल्यावर आता परिणीती प्रत्येक चित्रपटाची निवड काळजीपूर्वक करताना दिसते. अशा या बॉलीवूडच्या उच्चशिक्षित बबली गर्लला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!