बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांचा शाही विवाहसोहळा उदयपूरच्या ‘द लीला पॅलेस’मध्ये २४ सप्टेंबरला पार पडला. या शाही लग्नसोहळ्याचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या जोडप्याच्या लग्नातील सुंदर फोटोंवर बॉलीवूड सेलिब्रिटींसह राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : “शिवशंभूचा अवतार जणू…”, ‘सुभेदार’नंतर दिग्पाल लांजेकरांनी केली नव्या चित्रपटाची घोषणा, पहिली झलक आली समोर
परिणीती चोप्राने लग्नात भरजरी लेहेंगा, पेस्ट रंगाचे दागिने, ओढणीवर राघव चड्ढांचं नाव असा खास लूक केला होता. परिणीतीच्या सोनेरी रंगाच्या लेहेंग्याने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा लेहेंगा प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे.
परिणीतीचा सुंदर लेहेंगा डिझाइन करण्यासाठी मनीषला एक-दोन नव्हे तर अडीच हजार तास लागले. यात मनीषला त्याच्या संपूर्ण टीमने सहकार्य केलं होतं. अभिनेत्रीच्या लेहेंग्यावर हॅंडवर्क करण्यासाठी त्याने जुन्या सोन्याच्या धाग्यांचा वापर केला आहे. लग्नात अभिनेत्रीने रशियन पाचूपासून बनवलेला नेकलेस घातला होता. याशिवाय परिणीतीने परिधान केलेल्या लेहेंग्याच्या ओढणीवर राघव असं नाव मनीषने कोरलं आहे. यासाठी सुद्धा जुन्या विटेंज सोन्याच्या धाग्याचा वापर केला असल्याचं मनीषने नुकत्याच शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
परिणीतीच्या लेहेंग्यासंदर्भातील संपूर्ण माहिती मनीष मल्होत्राने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे शेअर केली आहे. लेहेंगा डिझाइन करायला २५०० तास लागल्याचे वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
दरम्यान, २४ सप्टेंबरला उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये या आलिशान हॉटेलमध्ये राघव-परिणीतीचा विवाहसोहळा पार पाडला. दोघांच्या लग्नासाठी खास तयारी करण्यात आली होती. चोप्रा आणि चड्ढा कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, बॉलीवूड सेलिब्रिटी, राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी या नव्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी उदयपूरमध्ये उपस्थित होते. कॉलेजमध्ये असताना परिणीती आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट झाली होती. परंतु, त्यांच्या प्रेम कहाणीला २०२२ पासून सुरूवात झाली. परिणीतीच्या ‘चमकीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.