परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांच्या लग्नातील फोटो समोर आले आहेत. अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लग्नातील फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये परिणीती व राघव दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत. दोघांच्या लग्नातील फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
परिणीती चोप्रा-राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले, दोघांचा पहिला फोटो समोर; साधेपणाचं चाहते करताहेत कौतुक
परिणीती व राघव यांनी ऑफ व्हाइट रंगाचे कपडे लग्नासाठी निवडले. परिणीतीने अगदी साधा मेकअप केला आहे. तसेच दागिनेही खूप कमी घातले आहेत. गळ्यात तिच्या कपड्यांवर मॅचिंग चोकर, मांगटिका आणि नाजुक कानातले तिने घातले. तर मेहंदीही अगदी कमी काढली होती. “नाश्त्याच्या टेबलावर पहिल्यांदा गप्पा मारल्या, तेव्हापासून आमची मनं म्हणत होती की खूप दिवसांपासून आम्ही या दिवसाची वाट पाहत होतो. त्यामुळे शेवटी आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झाले आहोत. आम्ही एकमेकांशिवाय जगूच शकत नव्हतो. म्हणून आता आमची कायम सोबत राहण्यासाठी नवी सुरुवात..”, असं परिणीतीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
परिणीतीच्या पोस्टवर बहीण प्रियांकाने कमेंट केली आहे. ‘दोघांनाही आशीर्वाद’ असं तिने म्हटलं आहे. याशिवाय वरुण धवन, नीना गुप्ता, अनुपम खेर, मनीष मल्होत्रा, नेहा धुपिया, इशा देओल यांनीही दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. परिणीती व राघव यांच्या लग्नातील फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दोघांनाही लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत.