अभिनेत्री परिणीती चोप्राने सप्टेंबर २०२३ मध्ये राजकीय नेते राघव चड्ढा यांच्याशी लग्नगाठ बांधली. उदयपूरमध्ये त्यांचा लग्नसोहळा थाटात पार पडला होता. त्यांच्या लग्नाला आता चार महिने झाले आहेत. एका कार्यक्रमात परिणीती चोप्राने राघव चड्ढांबरोबर हजेरी लावली. यावेळी तिने त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल माहिती दिली आहे.
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांनी नुकतीच ‘यंग लीडर्स फोरम’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी परिणीतीने पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला. “आम्ही लंडनमध्ये भेटलो. आम्हाला आमच्या क्षेत्रात सर्वोत्तम काम केल्याबद्दल गौरविण्यात येत होतं. राघवला राजकारण आणि मला मनोरंजन क्षेत्रातील कामासाठी पुरस्कार देण्यात येत होते. आम्ही त्या कार्यक्रमात एकमेकांना पहिल्यांदा भेटलो. मी, राघव आणि आयोजक सगळे एकमेकांना नाश्त्यासाठी भेटलो होतो. त्यादिवशी प्रजासत्ताक दिन होता,” असं परिणीती म्हणाली.
प्रसिद्ध अभिनेत्याने केलं अरेंज मॅरेज, सात वर्षांनी लहान आहे पत्नी, लग्नाचे फोटो आले समोर
“तुम्हाला हे ऐकून फिल्मी वाटेल, पण तुम्हाला विश्वास ठेवावाच लागेल की मी खरं सांगतेय. मी राघवबरोबर अर्धा बसले होते आणि त्याच वेळी मी ठरवलं की याच्याशीच लग्न करेन. त्यावेळी मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. त्याचं वय किती, त्याचं लग्न झालंय की नाही याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. कारण मी कधी राजकारण फॉलो केलं नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं,” असं परिणीती म्हणाली.
“नाश्त्यानंतर मी माझ्या रुममध्ये गेले आणि इंटरनेटवर त्याचं नाव टाकून माहिती शोधली. राघव चड्ढाचं वय किती? राघव चड्ढाचं लग्न झालंय का? हे मी शोधलं. कारण माझ्या डोक्यात एकच विचार होता की लग्नासाठी मला जसा जोडीदार हवा होता, तो हाच आहे. तो सिंगल होता, नंतर आम्ही एकमेकांशी बोलू लागलो,” असं परिणीतीने सांगितलं.