एखाद्या चित्रपटातून किंवा एखाद्या कलाकृतीतून कलाकाराला अचानक काढलं जाणं किंवा त्याच्याऐवजी नवीन कलाकाराला घेणं ही अगदीच सहजशक्य गोष्ट आहे. कलाकारांना त्यांच्या आयुष्यात अशा घटनांचा सामना अनेकदा करावा लागतो. अर्थात यावर काही कलाकार ‘होता है चलता है म्हणत’ पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. तर काही कलाकार मात्र यबद्दल दु:ख व्यक्त करत असतात. अशाच एक दिग्गज अभिनेत्री होत्या ज्यांना एका चित्रपटातून काढून टाकण्यात आल्यानं खूप दु:ख झालं होतं. या अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी (Praveen Babi).
परवीन बाबी यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम केले होते. पण तुम्हाला माहिती आहे का? की परवीन बाबी यांना अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या एका चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते आणि या घटनेचं त्यांना अतीव दु:ख झालं होतं. १९८१ साली आलेल्या ‘सिलसिला’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्याबरोबर परवीन बाबी यादेखील असणार होत्या. पण त्यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि त्यांच्याऐवजी जया बच्चन यांची निवड करण्यात आली.
ज्येष्ठ अभिनेते रणजीत यांनी एएनआयला मुलाखत दिली होती, ज्यात त्यांनी परवीन बाबी यांच्याबरोबरचे त्यांचे नाते सांगितले. तसंच ‘सिलसिला’ या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. तेव्हा त्यांनी हे सांगितले की, “परवीन बाबी माझी खूप चांगली मैत्रीण होती आणि खूपच सुंदरही होती. जी कायम आनंदी असायची. पण आम्ही एकदा काश्मीरमध्ये होतो तेव्हा ती खूप दुःखी होती आणि रडत होती.”

यानंतर त्यांनी असं म्हटलं की, “तिला दु:खी पाहून मी तिला विचारलं की, काय झालं परवीन? रडत का आहेस? तेव्हा तिने मला तिच्या ‘सिलसिला’ चित्रपटाबद्दलची गोष्ट सांगितली. त्यामुळे मला हे सांगण्यात अजिबात संकोच वाटत नाही आणि ही वस्तुस्थितीही आहे की, ‘सिलसिला’ नावाचा एक चित्रपट होता आणि त्यात परवीन बाबी आधी मूळ नायिका होती. पण तिला तो चित्रपट सोडण्यास सांगण्यात आले.”
पुढे रणजीत यांनी सांगितलं की, “काही वादामुळे रेखा आणि जया बहादुरी यांना त्या चित्रपटात घेण्यात आले. नाहीतर, परवीन आणि रेखा त्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री होत्या.” १४ ऑगस्ट १९८१ रोजी प्रदर्शित झालेला ‘सिलसिला’ हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, शशी कपूर आणि संजीव कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या