शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ या चित्रपटाकडे सध्या सगळयांचंच लक्ष लागलं आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. परदेशात या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत परदेशातील ॲडव्हान्स बुकिंगमधून ‘पठाण’ चित्रपटाने मोठी कमाई केली आहे.
‘पठाण’ प्रदर्शित व्हायला अजून १० दिवस बाकी आहेत. पण त्याआधीच पठाणचा दबदबा सर्वत्र दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, यूएईमध्ये या चित्रपटाची आतापर्यंत ६५ हजार डॉलर्सची ४५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर त्याचप्रमाणे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही ‘पठाण’ पाहण्यासाठी लोक प्रचंड उत्सुकता दाखवत आहेत. अमेरिकेत या चित्रपटाची आतापर्यंत ३.५ लाख डॉलरची २२ हजार ५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर ऑस्ट्रेलियात ‘पठाण’च्या पहिल्या दिवशीच्या शोजसाठी ६५ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर किमतीची ३ हजारहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.
हेही वाचा : ‘पठाण’चा ट्रेलर झळकला बुर्ज खलिफावर, शाहरुख खानचा उत्साह पाहून चाहते थक्क
शाहरुख खानच्या या चित्रपटाबाबत जर्मनीमध्येही प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी जर्मनीत ‘पठाण’ची ४ हजार ५०० हून अधिक तिकिटे विकली गेली. याशिवाय लोकांनी पहिल्याच वीकेंडसाठी पठाणची एकूण ९ हजार तिकिटे खरेदी केली आहेत. आत्तापर्यंत ‘पठाण’ने १५ हजार युरोंचा व्यवसाय फक्त जर्मनीतून केला आहे.