बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुखला पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करत आहेत. यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेला हा बिग बजेट व तगडी स्टारकास्ट असलेला चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले असले तरी त्याची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे.
‘पठाण’ चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक नवे विक्रम रचले आहेत. महत्त्वाचं म्हणजे चित्रपटाने भारतात ५०० कोटींचा टप्पा गाठला आहे. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते ‘पठाण’ने आता जगभरात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर, देशात ५०० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाने प्रदर्शनाच्या १२व्या दिवसापर्यंत इतकी कमाई केली आहे.
बॉक्स ऑफिस इंडियाच्या म्हणण्यानुसार, “पठाण’ची दमदार कमाई सुरू आहे. दुसऱ्या विकेंडचा प्रेक्षकांची थिएटर्सबाहेर गर्दी पाहायला मिळाली. रविवारी ५ फेब्रुवारी रोजी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या दिवसाच कलेक्शन २७-२८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. आकडे थोडे जास्त देखील असू शकतात. असं झाल्यास पठाणचा दुसरा विकेंड ६२-६३ कोटी रुपयांचा असेल.”
दरम्यान, शाहरुख खान, दीपिका पदुकोण व जॉन अब्राहम यांच्या भूमिका असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या १२ दिवसानंतरही चित्रपट चांगली कमाई करत आहे.