शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत व बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. चित्रपट कमाईचे नवीन विक्रम रचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. शाहरुखचा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. चित्रपटाला मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहता चित्रपटाचे शोदेखील वाढवण्यात आले आहेत.
‘पठाण’ने रचला इतिहास! चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी; देशभरात ‘इतके’ शो वाढवले
दमदार अॅक्शन सीन असलेला पठाण पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या बजेटबद्दल प्रश्न पडले आहेत. या चित्रपटाच्या बजेटसह यातील मुख्य कलाकार शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण यांच्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे. ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘पठाण’ बनवण्यासाठी निर्मात्यांना अंदाजे २४० कोटी रुपयांचा खर्च आला असेल. तसेच शाहरुख, दीपिका, जॉन यांच्या मानधनाचे अंदाजे आकडेही त्यांनी सांगितले आहे. शाहरुखने १०० कोटी मानधन घेतल्याची चर्चा होती, पण हा आकडा खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.
“पठाणसाठी शाहरुखने सुमारे ३५ कोटी रुपये घेतले, तर दीपिकाला जवळपास १० कोटी रुपये मानधन मिळालं. दुसरीकडे, जॉन अब्राहमला नकारात्मक भूमिकेसाठी जवळपास १५ कोटी रुपये दिले गेले असावेत” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच सुमारे १५० कोटी रुपये निर्मिती खर्च होता आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदला१५ कोटी रुपये देण्यात आल्याचं म्हटलं जातंय. चित्रपटाच्या प्रिंट आणि जाहिरातींवर १५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
दरम्यान, शाहरुखच्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता तो पहिल्या दिवशी जवळपास ४० कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपटाचे शो हाऊसफूल झाले असून प्रेक्षक थिएटरमध्ये तुफान गर्दी करत आहे. २०२३ मधील पहिलाच बिग बजेट ‘पठाण’ कमाईच्या बाबतीत नवे विक्रम रचण्याची शक्यता आहे.