बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शाहरुख, दीपिका आणि जॉन यांच्या या चित्रपटाला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत. आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. करोना काळानंतरचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होताना दिसत आहेत. पण आता पठाणच्या कमाईत घट पहायला मिळत आहेत.
‘पठाण’ने प्रदर्शनाच्या सात दिवसांतच भारतातून ३०० कोटींहून अधिक तर जगभरातून ६०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. ‘पठाण’ हा ३०० कोटींच्या क्लबमध्ये सर्वात कमी दिवसांमध्ये पोहोचणारा चित्रपट ठरला आहे. परंतु आता दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाच्या कमाईचा वेग थोडासा मंदावलेला दिसत आहे.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात ५५ कोटींची कमाई केली, तर जगभरातून या चित्रपटाने १०० कोटी कमावले. तर पहिल्या वीकएण्डपर्यंत या चित्रपटाने भारतातून २०० हुन अधिक कोटींचा गल्ला जमवला होता. तर काल म्हणजेच प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी या चित्रपटाने १७.५० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत भारतातून एकूण ३३३.५५ कोटींची कमाई केली आहे. या आठ दिवसांमध्ये पठाणच्या कमाईची गती मंदावताना दिसत आहेत. पण तरीही या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आपले स्थान निश्चित केलं आहे.
आणखी वाचा : अनंत अंबानीने साखरपुड्यात घातला होता ‘कार्टियर पँथर ब्रोच’, किंमत वाचून व्हाल थक्क
या चित्रपटातून शाहरुख खानने चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. शाहरुखचा हा जबरदस्त कमबॅक प्रेक्षकांनी धूमधडाक्यात साजरा केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रचंड वाद निर्माण झाला, तरी सुद्धा अगदी कमी प्रमोशन करूनही ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचला आहे.