शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ चित्रपट दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्या अडकताना दिसत आहे. या चित्रपटातील काही दृश्य बदलण्याची मागणी सीबीएफसीने केली आहे. या चित्रपटाच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वादाला तोंड फुटलं होतं. ज्यावर अनेकांनी आपली मतं आणि प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आता गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी या वादावर आपले विचार मांडले आहेत. जावेद अख्तर यांची ही प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन हे केंद्र सराकारचं एक डिपार्टमेंट असल्याचं सांगत जावेद अख्तर म्हणाले, “गाणं बरोबर आहे की चुकीचं हा निर्णय करणारे आपण कोणीच नाही. यासाठी आपल्याकडे एक एजन्सी आहे. त्या एजन्सीमध्ये सरकारने नियुक्त केलेले आणि समजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले लोक चित्रपट पाहून ठरवतात की हा चित्रपट प्रदर्शनासाठी पुढे जाऊ द्यायचा की नाही. कोणती दृश्य काढायची किंवा कोणती दृश्य चित्रपटात ठेवावी याचा निर्णयही हे लोक घेतात.”
जावेद अख्तर पुढे म्हणाले, “मला वाटतं चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांनी आणि आपण सर्वांनीच सर्टिफिकेशनवर विश्वास ठेवायला हवा. जी दृश्य त्यांनी काढून टाकण्यास सांगितली आहेत आणि जी ठेवण्याची परवानगी दिली आहे. या सगळ्या प्रक्रियेवर आपण विश्वास दाखवायला हवा.”
दरम्यान रिपोर्टनुसार CBFC ने चित्रपटाच्या प्रॉडक्शन बॅनरला चित्रपटातील काही दृश्य आणि संवाद बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्यात दीपिका पदुकोणचे काही क्लोज शॉट आणि भगव्या बिकिनीतील दृश्य यांचा समावेश आहे. याशिवाय ‘बहुत तंग किया’ या ओळीवरील सेंशुअस डान्स मूव्स बदलण्यास सांगितलं गेलं आहे. तसेच ‘लंगडे लूले’ शब्दाच्या जागी ‘टूटे फूटे’ तर PMO च्या जागी ‘प्रेसिडेंट किंवा मिनिस्टर’, ‘अशोक चक्र’च्या जागी ‘वीर पुरस्कार’, ‘मिसेज भारत माता’ ऐवजी ‘हमारी भारत माता’ असे शब्द वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.