शाहरुख खान हा त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे सध्या चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे या चित्रपटावरून वाद होताना दिसतोय तर दुसरीकडे शाहरुखचे चाहते त्याला चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या ट्रेलरलाही प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. प्रदर्शनानंतर काही तासातच याने यू ट्यूबवर काही मिलियन व्हूज मिळवले. तर आता हा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे.
इंटरनेशनल डिस्ट्रिब्यूशनचे उपसंचालक नेल्सन डिसूझा यांनी सांगितलं, “२०२३च्या बहुप्रतीक्षित चित्रपटांच्या यादीमध्ये ‘पठाण’चा समावेश आहे. त्यामुळे प्रेक्षकांसमोर ‘पठाण’ला भव्य पद्धतीने सादर केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख खान चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. त्यामुळे शाहरुखच्या परत येण्याचा आनंद दुबईमध्ये ही अगदी जोशात साजरा होणार आहे याचा आम्हाला आनंद आहे.”
आणखी वाचा : “ज्यांना वाद निर्माण करायची इच्छा असेल त्यांनी…,” नथुराम गोडसेच्या भूमिकेबाबत चिन्मय मांडलेकरचं रोखठोक मत
पुढे ते म्हणाले, “आता दुबईमध्ये टी-20 लीग सुरू आहे. यानिमित्त शाहरुख खान ही दुबईला आला आहे. त्यावेळी ‘पठाण’चा ट्रेलर बुर्ज खलिफावर दिसणार आहे. यावेळी शाहरुख खानही तिथे उपस्थित असेल. शाहरुख खानचा दुबईत मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे हा ट्रेलर बुर्ज खलिफावर दिसणं ही सर्वांसाठी एक खास ट्रीट असणार आहे.”
हेही वाचा : “ही कला आहे की अश्लीलता…” ‘पठाण’च्या वादावर भाष्य करताना मिलिंद सोमणला आठवलं त्याचं न्यूड फोटोशूट
‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. शाहरुख खानबरोबरच या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्वापूर्ण भूमिका आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे ‘पठाण’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी झाला झाला आहे.