‘पठाण’ चित्रपटाचं गाणं ‘बेशरम रंग’ प्रदर्शित झाल्यानंतर या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्याने बराच वाद सुरू आहे. सोशल मीडियावरून या चित्रपटाला खूप विरोध केला जात आहे. काही भाजपा नेत्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आता अभिनेत्री शर्लिन चोप्रानेही सोशल मीडियावर होत असलेल्या या विरोधाला पाठिंबा देत दीपिका पदुकोणवर टीका केली आहे. शर्लिनने मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्याला समर्थन दिलं आहे.
‘पठाण’ वादावर बोलताना शर्लिन चोप्रा म्हणाली, “दीपिका पदुकोणला तुकडे- तुकडे गँगबद्दल सहानुभूती वाटते. अशात जेव्हा ‘पठाण’ चित्रपटातील गाण्यात ती भगव्या रंगाची बिकिनी घालते तेव्हा तिला कोट्यवधी हिंदू स्वीकारू शकत नाहीत. हा रंग शुद्धता, प्रामाणिकपणा आणि समर्पणाचं प्रतीक आहे. मी नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्याशी पूर्णतः सहमत आहे.” याशिवाय तिने आमिर खानने केलेली कलशपूजा आणि शाहरुख खानने घेतलेलं वैष्णो देवीचं दर्शन यावरही प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांच्या ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची पूजा ते करू शकतात. पण सामान्य लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची त्यांनी काळजी घ्यायला हवी.”
आणखी वाचा- Video: “जग काहीही बोललं तरीही मी…”; Boycott Pathan ट्रेंडदरम्यान शाहरुख खानचं विधान
‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम’ रंग हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या गाण्यावर मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी या गाण्यात बरेच बदल करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “जर या गाण्यातील कपड्यांचा रंग बदलला गेला नाही तर मध्यप्रदेशमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात येईल.” आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं, “गाण्यात दाखवण्यात आलेल्या कपड्यांवर माझा आक्षेप आहे. हे गाणं पूर्णतः दूषित मानसिकतेने शूट करण्यात आलं आहे. यातील सीन आणि कपड्यांचे रंग बदलले गेले पाहिजेत. अन्यथा हा चित्रपट मध्यप्रदेशमध्ये प्रदर्शित केला जावा की नाही याचा विचार करावा लागेल.”
दरम्यान ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून सुरू असलेल्या या वादावर यशराज फिल्मकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबरच दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.