स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समाजाला मानवतेचा व सत्याचा मार्ग दाखवणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘फुले’ चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत व अनंत नारायण महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ११ एप्रिलला हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण अचानक चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादावरून प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी ‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून वादाला तोंड फुटलं आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आरोप करत म्हणाले, “‘फुले’ चित्रपटाच्या निर्मात्यांना ट्रेलरमधून वेगळं चित्र दाखवत पुन्हा जातीवाद करायचा आहे. चित्रपट वास्तवाला धरून नसेल तर हा चित्रपट योग्य नाही.” या वादादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन व निर्माते रितेश कुडेचा यांनी माजी राज्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.
त्यानंतर रितेश कुडेचा यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केलं. ‘बॉलीवूड हंगामा’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रितेश कुडेचा म्हणाले, “‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता २५ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आम्ही आज सकाळीचं हा निर्णय घेतला.” ‘फुले’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकल्यामुळे या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा ‘जाट’ हा एकच हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाच्या दोन दिवसाआधी ‘फुले’च्या प्रदर्शनाची तारीख बदलल्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.
‘फुले’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील ‘या’ सीनवर आक्षेप
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आनंद दवे म्हणाले होते की, ‘फुले’ चित्रपटाचं आम्ही मनापासून स्वागतचं करतो. असे चित्रपट झाले पाहिजे. पण, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक ब्राह्मण मुलगा सावित्रीबाई फुले यांच्यावर दगड-शेण फेकताना दिसला आहे. हा प्रकार दाखविण्यास आमचा विरोध नाही. तत्कालीन समाजाच्या हातून अशी काही पातके घडली असतील. परंतु महात्मा जोतीराव फुल्यांना शाळेसाठी मदत, देणगी देणारी लोक, शाळेत शिक्षक म्हणून जाणारे लोक, शाळेच्या पहिल्या तुकडीत सहा पैकी चार विद्यार्थी ब्राह्मण होते. हादेखील चित्रपटात उल्लेख आहे का? आणि उल्लेख असेल तर ते ट्रेलरमध्ये का नाही दाखवले गेले? असा आमचा सवाल आहे.
दरम्यान, ‘फुले’ चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी महात्मा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा राव साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असल्याचं चित्रपटाचं दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी सांगितलं.