All We Imagine As Light: ‘आरआरआर’ सिनेमातील ‘नाटू नाटू’ गाण्याला दोन वर्षांपूर्वी गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला होता. त्यानंतर यावर्षी ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या भारतीय चित्रपटाला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये नामांकन मिळालं होतं. ‘नाटू नाटू’नंतर पुन्हा एकदा या चित्रपटामुळे गोल्डन ग्लोब भारतात येईल, अशी आशा होती. मात्र भारताचं हे स्वप्न भंगलं आहे. हॉलीवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा केल्यानंतर पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ नॉन-इंग्लिश फीचर कॅटेगरीतील सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चरसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार गमावला आहे. दिग्दर्शक जॅक ऑडियर्ड यांच्या म्युझिकल क्राइम कॉमेडी एमिलिया पेरेझ सिनेमाने ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ला मागे टाकत हा पुरस्कार जिंकला.
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ने एमिलिया पेरेझ, द गर्ल विथ द नीडल, आय अॅम स्टिल हिअर, आणि द सीड ऑफ द सेक्रेड फिग सारख्या चित्रपटांशी सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर या कॅटेगरीत स्पर्धा केली. मात्र चित्रपट पुरस्कार जिंकू शकला नाही. ‘नाटू नाटू’नंतर दुसरा गोल्डन ग्लोब भारतात येईल, अशी आशा होती, मात्र ते स्वप्न भंगलं आहे.
हेही वाचा – जगभर गाजलेला All We Imagine As Light ओटीटीवर रिलीज; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा? वाचा
पायल कपाडियाच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ या चित्रपटाला प्रतिष्ठेच्या कान २०२४ चित्रपट सोहळ्यात ‘ग्रां पी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शिका ठरून पायल कपाडियाने इतिहास रचला. ‘ग्रां प्री’ हा कानमधील ‘पाम डोर’ पुरस्कारानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे.
‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’बद्दल बोलायचं झाल्यास हा चित्रपट नुकताच ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. मुंबईतील दोन मल्याळी परिचारिकांच्या एकमेकांशी जोडलेल्या आयुष्याची कथा सांगणारा हा चित्रपट आता डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. या चित्रपटात कनी कुसरुती, दिव्या प्रभा, छाया कदम, हृधू हारून आणि अजीस नेदुमनगड हे कलाकार आहेत.