मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष हिने मराठी चित्रपटांसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही दर्जेदार भूमिका वठवल्या आहेत. आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अमृता तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. ती अनेकदा चित्रपट, इतर कलाकार आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही बोलत असते. दरम्यान, अलीकडेच अमृताने ‘गली बॉय’ चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.
एक विशिष्ट भूमिका साकारल्यानंतर बॉलिवूडमध्ये टाइपकास्ट होण्याबद्दल अमृताने खुलासा केला आहे. तिने रणवीर सिंग आणि आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गली बॉय’ चित्रपटात रणवीरच्या आईची भूमिका साकारली होती. पण तिला या चित्रपटात आईची भूमिका न करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचं कारण म्हणजे कमी वयात अशा भूमिका केल्यास बॉलिवूडमध्ये टाइपकास्ट होण्याचा धोका वाढतो. पण याबद्दल खुलासा करताना अमृता म्हणाली की आता ओटीटीने ही भीती कमी केली आहे, तसेच ओटीटीमुळे अनेक प्रकराच्या भूमिका साकारण्याच्या आणि प्रयोग करण्याच्या संधी वाढल्या आहेत.
अमृता म्हणाली, “जेव्हा मी गली बॉय चित्रपटात रणवीरची आई रजिया अहमदची भूमिका केली, तेव्हा सर्वांनी मला सांगितलं की हे करू नकोस, ही खूप मोठी जोखीम आणि चूक आहे. कारण तू तुझ्या वयाच्या अभिनेत्याच्या आईची भूमिका करत आहेस. तेव्हा मला माहीत नव्हतं की ओटीटी येईल. ओटीटीमुळे गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत. त्यानंतर मला बार डान्सरची भूमिका करायला मिळाली.” अमृताने रणवीर सिंगच्या आईची रजिया अहमदची भूमिका साकारली होती. अमृता ही रणवीरपेक्षा फक्त ५-६ वर्षांनी मोठी आहे.
यावेळी अमृताने दीप्ती नवल यांच्या मुलाखतीची आठवणही सांगितली. दीप्ती यांनाही नंतरच्या काळात अशाच समस्येचा सामना करावा लागला होता. दीप्तींना टाइपकास्ट व्हायचं नव्हतं आणि त्यांच्याकडे इतर कोणतेही पर्याय नसल्यामुळे, नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं जवळजवळ बंद केलं, असं अमृताने सांगितलं.