Phule Movie झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित ‘फुले’ या हिंदी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित हा चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी महात्मा फुले यांची जयंतीही आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना थोर समाजसेवक म्हटलं जातं. या चित्रपटातून त्यांचीच कहाणी समोर येणार आहे.
‘फुले’ – परिवर्तनाची कहाणी
महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह स्त्री शिक्षण, जातिनिर्मूलन आणि सामाजिक समतेसाठी झुंज दिली. ब्रिटिशकालीन भारतात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, शेतकरी आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांची प्रेरणादायी कथा आता रूपेरी पडद्यावर उलगडणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ ऐतिहासिक घटनांचा आढावा घेत नाही, तर सामाजिक समतेचा लढा नव्या पिढीसमोर आणणार आहे. महात्मा आणि सावित्रीबाई फुले यांनी उभ्या केलेल्या चळवळींचा आजही आपल्या समाजावर मोठा प्रभाव आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं कायमच म्हटलं जातं. आता ‘फुले’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटातून महात्मा फुलेंचा जीवनपट उलगडला जाणार आहे.
दिग्दर्शक आणि कलाकारांचं उत्तम सादरीकरण
या चित्रपटाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत नारायण महादेवन यांनी केलं आहे. ऐतिहासिक विषयावर दमदार हातखंडा असलेल्या महादेवन यांनी याआधीही अनेक महत्त्वाचे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.
प्रतीक गांधी साकारणार महात्मा फुलेंची भूमिका
महात्मा फुले यांच्या भूमिकेत ‘स्कॅम १९९२’ फेम प्रतीक गांधी दिसणार असून, सावित्रीबाई फुले यांची भूमिका पत्रलेखा साकारत आहे. या दोघांनी या भूमिकांसाठी विशेष तयारी केली असून, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ही ऐतिहासिक पात्रं जिवंत होतील, असा विश्वास आहे. विनय पाठक हेदेखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
उत्कृष्ट निर्मिती आणि भव्य प्रस्तुती
‘फुले’ चित्रपटाचे निर्माते प्रणय चोक्शी, जगदीश पटेल, रितेश कुडेचा,अनुया चौहान कुडेचा, सुनील जैन आणि डॉ. राज खवारे असून, सहनिर्मितीची जबाबदारी क्रांती शानभाग, कलापी नागडा,रोहन गोडांबे, परीधी खंडेलवाल यांनी उचलली आहे. झी स्टुडिओज् प्रस्तुत, डान्सिंग शिवा फिल्म्स आणि किंग्जमेन प्रोडक्शन्स निर्मित यांच्या माध्यमातून ‘ फुले’ हा हिंदी चित्रपट जगभर ११ एप्रिल २०२५ प्रदर्शित होणार आहे.