बेधडक, बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जाणारे अभिनेता पियुष मिश्रा यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. आपलं आत्मचरित्र ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’मध्ये त्यांनी बालपणी घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाचा उल्लेख केला आहे. शालेय वयात एका महिला नातेवाईकाने कशाप्रकारे त्यांचं लैंगिक शोषण केलं होतं हे त्यांनी आपल्या या आत्मचरित्रात सांगितलं आहे. ही घटना ५० वर्षांपूर्वीची आहे. ज्याने त्यांच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. त्यांच्याबरोबर असं काही घडलं होतं ज्यानंतर त्यांना शरीरसंबंधांबद्दल भीती वाटू लागली होती.
स्वतःबरोबर घडलेल्या या धक्कादायक घटनेबद्दल पियुष मिश्रा यांनी न्यूज पीटीआयशी बोलतानाही सांगितलं आहे. ते म्हणाले, “जवळपास ५० वर्षांपूर्वीची घटना आहे. त्यावेळी मी ७ व्या इयत्तेत शिकत होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. मी माझ्या पुस्तकात फक्त सत्य काय आहे तेच लिहिलं आहे. फक्त लोकांची नावं बदलली आहेत. कारण मला कोणचाही बदला घ्यायचा नव्हता. मी त्या घटनेनंतर खूपच स्तब्ध झालो होतो आणि जे काही घडलं त्याबद्दल मी हैराण होतो.”
आणखी वाचा- “हा आपला मूर्खपणा…” अभिनेते, गीतकार पियुष मिश्रा यांची बॉलिवूडच्या दिग्दर्शकांवर सडकून टीका
पियुष मिश्रा पुढे म्हणाले, “शरीरसंबंध एक अशी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा या गोष्टींना पहिल्यांदा समोरे जाता तेव्हा त्याची सुरुवात चांगली व्हायला हवी. कारण जर असं झालं नाही तर तुम्ही आयुष्यभर याची भीती तुमच्या मनात राहते. आयुष्यभर यामुळे तुम्ही त्रासलेले राहतात. त्या लैंगिक शोषणाने मला आयुष्यभर गोंधळून टाकलं. बराच मोठा काळ यासाठी गेला आणि अनेकांच्या मदतीने मी ही भीती आणि गोंधळ या सगळ्यातून बाहेर पडलो.”
आणखी वाचा- “प्रेग्नन्सीचं नाटक करते”, म्हणणाऱ्यांवर भडकली दीपिका कक्कर; म्हणाली, “तुमच्या सर्वांबरोबर…”
दरम्यान पियुष मिश्रा यांचं आत्मचरित्र ग्वालियारपासून सुरू होतं जिथे त्यांनी बालपण घालवलं होतं. त्यानंतर दिल्लीच्या कल्चरल हब मंडी हाऊसचे दिवस ते मुंबईपर्यंतचा प्रवास या सगळ्या गोष्टी या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, “मी माझ्या पुस्तकातील सर्व घटना सत्य आहेत, फक्त नावं बदलली आहे. मी काही लोकांची ओळख लपवू इच्छित होतो. त्यातील काही स्त्रिया आणि काही पुरुष आता फिल्म इंडस्ट्रीतील मोठी नावं आहेत. मला कोणत्याही प्रकारचा बदला घ्यायचा नाही किंवा कोणालाही दुखवायचं नाही.”