प्रसिद्ध नाटककार, कवि, गीतकार आणि अभिनेते पीयूष मिश्रा त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओखळले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते संगीतकारही आहेत, अनुराग कश्यपच्या ‘गुलाल’ चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. अलीकडेच पीयूष मिश्रा यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले होते.
नुकतंच ‘लल्लनटॉप’ या मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पीयूष मिश्रा यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि नेत्यांवर भाष्य केलं आहे. राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी पीयूष यांनी भाष्य केलं आहे. याबरोबरच या दोघांबद्दलचे त्यांचे विचार त्यांनी या मुलाखतीमधून मांडले आहेत.
आणखी वाचा : “माझ्या आयुष्याची वाताहत…” पीयूष मिश्रा यांची ‘कम्युनिझम’वर सडकून टीका
पीयूष म्हणाले, “मी हे मान्य करतो की श्रीमती इंदिरा गांधींनंतर त्या ताकदीचे नेते हे फक्त नरेंद्र मोदी झाले आहेत. एक राजनेता म्हणून त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. राहुल गांधी हे एक प्रामाणिक आणि सच्चे नेते आहेत. मला ते आवडतात, ते फार भोळे आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार आहेत. वडील राजीव गांधी, आजी इंदिरा गांधी अशा प्रतिष्ठित घराण्याशी त्यांचा संबंध आहे. त्यांच्यात नक्कीच इतर गुण भरपूर आहेत पण राजकारण हे त्यांच्यासाठी योग्य नाही हे सांगणारं त्यांच्या आसपास दुर्दैवाने कुणीच नाही.”
या मुलाखतीमध्ये पीयूष मिश्रा यांनी आणखी बऱ्याच धमाल गप्पा मारल्या. याबरोबरच ‘कम्युनिझम’वरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांच्या आयुष्यातील बरेच वेगवेगळे किस्से त्यांनी शेअर केले. पीयूष हे सध्या त्यांच्या ‘बल्लीमारन’ या बॅण्डचे शोज करण्यात व्यस्त आहेत. याबरोबरच ते आता शंकर दिग्दर्शित ‘इंडियन २’ या चित्रपटात कमल हासनबरोबर काम करणार आहेत.