प्रसिद्ध नाटककार व अभिनेते पीयूष मिश्रा त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओखळले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेय. ते संगीतकारही आहेत, तसेच ते कविताही लिहितात. अलीकडेच पीयूष मिश्रा यांनी त्यांच्या आत्मचरित्रातून वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले होते. नुकतेच पीयूष मिश्रा यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्यावर झालेला कम्युनिस्ट लोकांचा प्रभाव याबद्दल भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘लल्लनटॉप’या मीडिया पोर्टलच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पीयूष मिश्रा यांनी बरेच किस्से सांगितले. या कार्यक्रमात जेव्हा ते कॉमरेड होते तेव्हाच्या आठवणी विचारल्यावर पीयूष मिश्रा यांनी स्पष्टपणे सांगितले की, या कॉमरेड मंडळींनीच त्यांच्या जीवनाची सर्वात जास्त हानी केली.

आणखी वाचा : छोटा राजनशी संपर्क, पत्रकाराची हत्या; कोण आहे जिग्ना वोरा? जिच्यावर हंसल मेहतांची ‘स्कूप’ सीरिज बेतलेली आहे

याबद्दल बोलताना पीयूष मिश्रा म्हणाले, “या कॉमरेड लोकांमुळेच माझ्या आयुष्याची वाताहत झाली. दिल्लीमध्ये तब्बल २० वर्षे माझ्यावर कम्युनिस्ट लोकांचा पगडा होता. कुटुंब वाईट आहे, आई वाईट आहे, वडील वाईट आहेत. त्यामुळे आपल्याला समाजासाठी काम करायचे आहे, असे त्यांचे विचार होते. मग आई, वडील, कुटुंब हा या समाजाचा भाग नाही का? क्रांती आज येणार, उद्या येणार असे करत तब्बल २० वर्षे त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतले.”

पुढे पीयूष म्हणाले, “पैसे कमावणे पाप आहे, जो पैसा कमावतो तो भांडवलशाहीचा गुलाम असतो. त्यामुळे पैसे कधीही कामवायचे नाहीत अशी यांची विचारधारा होती. या सगळ्यात मी माझे संपूर्ण आयुष्य झोकून देऊन काम केले. या लोकांवर स्टॅलिनचा प्रचंड प्रभाव आहे. कम्युनिझम म्हणजे स्टॅलिन हे त्यांच्यासाठी एक समीकरण आहे. एवढी वर्षे काम करून मी खूप थकलो, अचानक मला भूक लागायला लागली. आधीसुद्धा भूक लागायची पण या कामात स्वतःला झोकून दिले असल्याने त्याची जाणीव होत नव्हती. त्या वेळी मला जाणवले की, मी एक वाईट पती, वाईट मुलगा सिद्ध झालोच आहे. आता मात्र एक वाईट बाप हे बिरुद न लागलेलेच बरे, कारण इतकी वर्षे घराकडे, कुटुंबाकडे काहीच लक्ष दिले नव्हते. त्या वेळी मी कम्युनिझम सोडून चित्रपटात काम करायचा निर्णय घेतला.”

पीयूष मिश्रा हे सध्या त्यांच्या ‘बल्लीमारन’ या बॅण्डचे शोज करण्यात व्यस्त आहेत. याबरोबरच ते आता शंकर दिग्दर्शित ‘इंडियन २’ या चित्रपटात कमल हासनबरोबर काम करणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Piyush mishra slams communism says it ruined his life avn