हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनाच्या धक्क्यातून मनोरंजनसृष्टी अजूनही सावरलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त करणारे एक पत्रदेखील पाठवले होते, जे अनुपम खेर यांनी नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.
या पोस्टमधून अनुपम खेर यांनी सतीश यांच्या पत्नीच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. मोदींनी पत्रात लिहिले आहे की, या कठीण काळात आम्ही सगळेच तुमच्या आणि कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत. तर हे पत्र वाचून सतीश यांची पत्नी शशी यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की “देशाचे प्रधानमंत्री जेव्हा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर धीर देतात, तेव्हा त्या दु:खाला सामोरे जाण्याचे अधिक बळ मिळते.”
आणखी वाचा : भाईजानच्या ‘या’ चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा; मतभेद बाजूला ठेवून सलमान खान व साजिद नाडियाडवाला एकत्र येणार?
पंतप्रधानांचं हे पत्र शेअर करत अनुपम खेर यांनी पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये सतीश यांची पत्नी शशी यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करताना ते लिहितात, “आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. या दु:खाच्या प्रसंगी तुमचे संवेदनशील पत्र आमच्या कुटुंबाच्या दुःखावर फुंकर घालायचे काम करत आहे! प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर देशाचे पंतप्रधान सांत्वन करतात तेव्हा त्या दु:खाला सामोरे जाण्याचे बळ मिळते. माझ्या वतीने, आमची मुलगी वंशिका, आमचे संपूर्ण कुटुंब आणि सतीशजींच्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानते. आणि तुमच्या दीर्घायुष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.”
सतीश कौशिक यांनी ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘तेरे नाम’ आणि कागजसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर ‘मिस्टर इंडिया’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ‘मिस्टर और मिसेज खिलाड़ी’, ‘दिवाना मस्ताना’, ‘बड़े मियां छोटे मियां’,सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आजही त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत आणि सदैव राहतील.