शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. १५ दिवसात या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींहून अधिक कमाई केली. चित्रपटाला बराच विरोध होऊनसुद्धा याने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याने याची चर्चा होत आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘पठाण’चं कौतुक केलं आहे.
चित्रपटाचं नाव न घेता पंतप्रधानांनी एकूणच या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर पडलेला प्रभाव आणि होणारा व्यवसाय याची दखल घेतली आहे. संसदेत नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलं. या भाषणात त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला. याबरोबरच श्रीनगरमधील परिस्थितीवरसुद्धा नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. याचदरम्यानची त्यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “जर पठाण सुपरहीट होऊ शकतो…” नेटफ्लिक्सच्या ‘क्लास’ वेबसीरिजमधील चंदन आनंद स्पष्टच बोलले
या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, “बऱ्याच दशकांनंतर श्रीनगरमध्ये थिएटर हाऊसफुल्ल झालेले पाहायला मिळालं आहे.” मोदी यांच्या या वाक्यावरून शाहरुख खानच्या बऱ्याच चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधानसुद्धा आता ‘पठाण’चं कौतुक करत आहेत या आशयाची ट्वीट करायला सुरुवात केली. पंतप्रधानांचं हे भाषण ऐकून एका ट्विटर युझरने ट्वीट करत लिहिलं, “बॉयकॉट करणाऱ्यांचं, कमाईचे खोटे आकडे म्हणून बोलणाऱ्यांचं कसं होणार? आता तर पंतप्रधान यांनीदेखील चित्रपटाचं कौतुक केलं आहे.”
‘पठाण’ने जगभरात आत्तापर्यंत एकूण ८६० कोटी एवढी कमाई केली आहे, तर भारतात या चित्रपटाने ४०० कोटींची कमाई करत आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. १५ दिवसांनीसुद्धा बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ ठाण मांडून बसला आहे. सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’चं दिग्दर्शन केलं आहे तर या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खानने जबरदस्त कमबॅक केलं आहे.