ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांचं शुक्रवार, ४ एप्रिल रोजी निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी मनोज कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत पोकळी निर्माण झाली आहे. मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं होतं. शिवाय अनेकांनी त्यांच्याबद्दलच्या भावूक पोस्टही शेअर केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही आपल्या सोशल मीडियावर आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली होती.
अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिवंगत मनोज कुमार यांच्या पत्नी शशी गोस्वामी यांना पत्र लिहून शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या पत्रात मनोज कुमार यांच्या चित्रपटसृष्टीतील वारशाची आठवण करून दिली आहे. तसंच त्यांच्याबरोबरच्या भेटी आणि संभाषणांचा उल्लेख केला आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या या पत्रात मनोज कुमार यांच्या भेटी आणि त्यांच्याबरोबर संभाषणं कायमच स्मरणात राहतील असं म्हटलं आहे.
७ एप्रिल रोजी लिहिलेल्या या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, “श्री मनोज कुमारजी यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंब आणि शुभचिंतकांबरोबर आहेत. ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते श्री मनोज कुमार जी यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे भारताचे वैभव प्रभावीपणे दाखवले आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांनी देशवासीयांमध्ये देशभक्तीची भावना बळकट करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.”
यापुढे या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, “भारताच्या महत्त्वाकांक्षी तरुणाच्या भूमिकेमुळे एकीकडे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला जिवंतपणा आला आणि दुसरीकडे, लोकांना देशाच्या चांगल्या उद्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. समाजाप्रती असलेली त्यांची जबाबदारी कलात्मकपणे व्यक्त करून त्यांनी चित्रपटाला सतत समृद्ध केले. भारतीय संस्कृती आणि मूल्यांवर आधारित त्यांच्या चित्रपटांमधील अनेक गाणी देशाप्रती प्रेम आणि समर्पणाची भावना व्यक्त करतात.”
पत्राच्या शेवटी पंतप्रधानांनी मनोज कुमार यांच्याबरोबरच्या भेटींचा उल्लेख करत असं म्हटलं आहे की, “श्री मनोज कुमारजींबरोबरच्या माझ्या बैठका आणि विचारमंथनात्मक चर्चा मला नेहमीच स्मरणात राहतील. त्यांचे कार्य आपल्या पिढ्यांना देश आणि समाजासाठी काम करण्यासाठी प्रेरणा देत राहील. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. शोकाकुल कुटुंब आणि असंख्य शुभचिंतकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि संयम देवो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो.”
दरम्यान, दिवंगत मनोज कुमार यांची चार दशकांची प्रदीर्घ कारकीर्द आहे. ‘फॅशन’ या चित्रपटातून १९५७ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. १९९५ मध्ये आलेला ‘मैदान ए जंग’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांची देशभक्तिपर गीतं आजही लोकप्रिय आहेत. आपला अभिनय आणि चित्रपटांमधून देशभक्तीची गोडी लावणारा असा हा कलाकार आता काळाच्या पडद्याआड गेला आहे.