Orry Allegedly Drinks Near Vaishno Devi Base Camp : बॉलीवूड सेलिब्रिटींचा बेस्ट फ्रेंड ओरी म्हणजेच ओरहान अवत्रामणी वादात सापडला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथील एका हॉटेलमध्ये त्याने मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. कटरा येथील एका हॉटेलमध्ये मद्यप्राशन करून कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ओरीसह आठ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिली आहे.
वैष्णोदेवी बेस कॅम्प कटरा येथील हॉटेलमध्ये मद्यप्राशन केल्याप्रकरणी ओरी आणि इतर ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्यानुसार कटरामध्ये दारू विकणे, बाळगणे आणि पिणे याला सक्त मनाई आहे. हा नियम मोडल्याने ओरीसह ८ जणांविरुद्ध तक्रार दाखल केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
ओरी व त्याचे मित्र कटरा मॅरियट रिसॉर्ट अँड स्पामध्ये थांबले होते. तिथे १५ मार्च रोजी ते दारू पित होते. हॉटेल प्रशासनाने तिथे मद्य आणि मांसाहारी पदार्थांवर बंदी असल्याचं आधीच सांगितलं होतं. मात्र तरीही त्यांनी नियम मोडले. ओरहान अवत्रामणी (ओरी), दर्शन सिंह, पार्थ रैना, रितिक सिंह, राशी दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि अॅनास्तासीला अरझामास्किना या सर्वांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे सर्वजण हॉटेल परिसरात दारू प्यायले, असं तक्रारीत म्हटलं आहे.
“माता वैष्णो देवी तीर्थक्षेत्रात कॉटेज सूटमध्ये दारू आणि मांसाहाराला मनाई आहे असे सांगूनही या सर्वांनी मद्यपान केले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन एसएसपी रियासी परमवीर सिंह यांनी नियम मोडणाऱ्या या ८ जणांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. जेणेकरून धार्मिक स्थळांवर अमली पदार्थ किंवा दारूचे सेवन करून सामान्य जनतेच्या भावना दुखावणारे कोणतेही कृत्य सहन न केले जाणार नाही हा संदेश लोकांमध्ये जाईल,” असं निवेदनात म्हटलंय.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारे कृत्य करणाऱ्या ओरी व त्याच्या मित्रांना शोधण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
“जे लोक कायद्याचे पालन करत नाहीत आणि ड्रग्ज किंवा दारू पिऊन शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात त्यांना माफ केलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असं रियासीचे एसएसपी म्हणाले.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अद्याप ओरीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.