सुदीप्तो सेनचा ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असून, या चित्रपटाला प्रचंड विरोध होत आहे. बॉलीवूडमधील सर्व कलाकार याला पाठिंबा देत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाच्या कथेवरून राजकारणही सुरू झाले आहे. चित्रपटाच्या कथेवर अनेक राजकीय पक्ष आक्षेप घेत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांवर टीका केली आहे.
मीडियाशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की, “जे पक्ष चित्रपटाला विरोध करीत आहेत ते दहशतवाद्यांच्या पाठीशी उभे आहेत. मी स्वत: एक आई असल्याने हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकते. जे राजकीय पक्ष आपल्या देशातील नागरिकांवर होणारे अत्याचार विसरतात, ते दहशतवादी कारस्थानांच्या पाठीशी उभे आहेत, असे मानले जाऊ शकते,ठ असे स्मृती इराणी म्हणाल्या.
द केरला स्टोरी’ चित्रपट विरोधानंतरही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करीत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी ८.३ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जवळपास १२ कोटी रुपये कमावले होते. पाच दिवसांत चित्रपटाने ५६. ७२ कोटींचा गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांत हा चित्रपट अजून चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.