दिवंगत अभिनेते ऋषी कपूर(Rishi Kapoor) यांचे बॉलीवूडमधील योगदान महत्त्वाचे मानले जाते. त्यांनी विविध भूमिका साकारत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक कलाकारांबरोबर काम केले होते. आजही त्यांच्याबद्दल अनेक जण बोलताना दिसतात. त्यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग, घटना लिहिल्या आहेत. त्याबाबतही अनेकदा चर्चा होताना दिसते. आता अभिनेत्री पूनम ढिल्लों(Poonam Dhillon) यांनी एका मुलाखतीत ऋषी कपूर यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे.

तुमचं इंग्रजीचं ज्ञान…

पूनम ढिल्लों यांनी नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत ऋषी कपूर यांची आठवण सांगताना त्या म्हणाल्या, “मी अनेकदा त्यांची तक्रार पत्नीला नीतूला करत असे. कारण- ऋषी कपूर आम्हाला अनेकदा ओरडत असत. त्यांच्यासमोर आम्ही लहान होतो.” पुढे पूनम ढिल्लों यांनी असाही खुलासा केला की, ऋषी कपूर त्यांना इंग्रजीमध्ये बोलायला येते, हे सेटवर दाखवत असत. त्याबरोबरच त्यांच्या अवतीभोवती सेटवर असणाऱ्या अनेकांना इंग्रजी बोलायला किंवा वाचायला येत नाही, असा त्यांचा समज असे. त्याबाबत अधिक बोलताना पूनम ढिल्लों म्हणाल्या, “ऋषी कपूर यांना इंग्रजी येते याचा त्यांना अभिमान होता. ते टाइम मॅगझिन वाचायचे. त्यामुळे ते अनेकदा असा विचार करायचे की, त्यांनाच उत्तम इंग्रजी वाचता येते. इतरांना फार इंग्रजी येत नाही, असा त्यांचा समज असायचा. सुरुवातीला मला त्यांची भीती वाटत असे. त्यानंतर मी त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी कम्फर्टेबल झाले. मला त्यांच्याशी बोलण्याचा आत्मविश्वास आला. त्यानंतर मी त्यांना सांगू लागले. तुम्ही दहावी नापास आहात, मी ग्रॅज्युएट आहे. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले नव्हते. त्यामुळे मी त्यांना सांगत असे की, तुमचं इंग्रजीचं ज्ञान दाखवू नका. ज्या अभिनेत्रींना इंग्रजीतील शब्द माहीत नसायचे, त्या त्यांच्या शब्दसंग्रहामुळे प्रभावित व्हायच्या. मी अनेकदा वाद घालत असे. त्यांची पत्नी नीतू त्यांना सडू, असे म्हणत असे.

पुढे पूनम ढिल्लों यांनी असेही सांगितले की, जेव्हा ऋषी कपूर त्यांचे खुल्लम खुल्ला हे आत्मचरित्र लिहित होते. तेव्हा त्यांनी अभिनेत्रीचे आभार मानले होते. पूनम ढिल्लो यांनी त्याचे कारण विचारले होते. त्यावर ऋषी कपूर यांनी असे सांगितलेले की, मी माझं आत्मचरित्र लिहीत आहे. ज्या अभिनेत्रींबरोबर मी काम केले, त्यांच्याबद्दल आठवत आहे. ज्यांनी माझ्या आयुष्यात, माझ्या करिअमध्ये महत्त्वाचे योगदान दिले, त्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, माझ्या या प्रवासाचा भाग असल्याबद्दल मला आभार मानायचे आहेत.

ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ वर्षी एप्रिल २०२० मध्ये निधन झाले. पूनम ढिल्लों आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. ये वादा रहा, बीवी ओ बीवी, जमाना अशा चित्रपटात काम केले आहे. पूनम ढिल्लों यांनी ऋषी कपूर हे सहज अभिनय करणारे अभिनेते होते, असे म्हणत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.