बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्री सरव्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग) निधन झालं. अभिनेत्रीच्या आकस्मिक निधनामुळे तिच्या चाहत्यांसह बॉलीवूडकरांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सकाळी पूनमच्या टीमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून निधनासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. या घटनेवर आता अभिनेत्रीचा बॉडीगार्ड अमिन खानने प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या ११ वर्षांपासून अमिन खान पूनमचा बॉडीगार्ड म्हणून काम करत आहे. इ-टाइम्सशी टीव्हीशी चर्चा करताना अमिन म्हणाला, “माझ्यासाठी ही घटना धक्कादायक असून माझा विश्वासच बसत नाहीये. मी तिच्या बहिणीला संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पण, तिच्याकडून अद्याप मला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. मला मीडियाच्या बातम्या वाचून तिच्या निधनाबाबत समजलं.”
हेही वाचा : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेची ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची; शेअर केलेला गोव्यातील व्हिडीओ
आमिन खान पुढे म्हणाला, “३१ जानेवारीला मी तिच्याबरोबर फिनिक्स मॉलमध्ये एका फोटोशूटसाठी गेलो होतो. रोहित वर्मांसाठी तिने शूट केलं होतं. ती नेहमी फिट असायची. त्यामुळे मला यावर विश्वास नाही. पूनमने या आजारपणाबद्दल केव्हाच आम्हाला सांगितलं नाही. याशिवाय तिला कोणताही आजार आहे असं तिच्याकडे पाहून मला कधीच जाणवलं नाही. आता फक्त तिची बहीणच मला खरं काय ते सांगू शकते. तिला संपर्क केलाय आता तिच्या उत्तराची मी वाट पाहतोय.”
“आम्ही नुकत्याच एका शूटिंगसाठी गोव्याला गेलो होतो. तेव्हा सुद्धा पूनम स्वत:च्या आरोग्याची उत्तमरित्या काळजी घेत होती. यासाठी तिच्याकडे पर्सनल ट्रेनरदेखील होता. शिवाय तिने मद्यपानाच्या सगळ्या सवयी कमी केल्या होत्या. मी तिच्या घरी जाऊन आलो होतो तरीही, मला याबद्दल कधीच काही जाणवलं नाही.” असं बॉडीगार्ड आमिन खानने सांगितलं.
हेही वाचा : Poonam Pandey Death : “शेवटच्या टप्प्यात कर्करोगाचं निदान”, पूनम पांडेच्या निधनाबाबत मॅनेजरची प्रतिक्रिया
दरम्यान, पूनमची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट ही गोव्यात पार्टी करतानाची आहे. कंगना राणौतच्या लॉकअपच्या पहिल्या सीझनमध्ये ती झळकली होती. या कार्यक्रमात तिने वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक खुलासे केले होते. तिने ‘नशा’ या चित्रपटातून पूनम पांडेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय २०११ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी केलेल्या एका वक्तव्यामुळे पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती.