अभिनेत्री पूनम पांडेच्या आकस्मिक निधनामुळे तिच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सरव्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)मुळे तिचं निधन झाल्याची माहिती पूनमच्या टीमने मीडियाशी संवाद साधताना दिली आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या टीमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून यासंदर्भात पोस्ट देखील शेअर केली आहे. पूनमच्या निधनामुळे बॉलीवूडकरांसह तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
गुरुवारी (१ फेब्रुवारी) रात्री पूनम पांडेचं वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झालं. यासंदर्भात तिची जवळची मैत्रीण व टेलिव्हिजन अभिनेत्री संभावना सेठने प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज १८ शी संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली, “परमेश्वरा… खरंच खूप वाईट झालं. ‘खतरों के खिलाडी’मध्ये आम्ही एक एकत्र स्क्रीन शेअर केली होती. सार्वजनिक कार्यक्रमात आमच्या भेटीगाठी व्हायच्या. पण, यादरम्यान तिने कधीच तिच्या अडचणी, आजार किंवा समस्येविषयी मला सांगितलं नाही. ही घटना माझ्यासाठी खरंच खूप धक्कादायक आहे. मी हे दु:ख नाही पचवू शकत.”
हेही वाचा : Poonam Pandey Death : “शेवटच्या टप्प्यात कर्करोगाचं निदान”, पूनम पांडेच्या निधनाबाबत मॅनेजरची प्रतिक्रिया
संभावना पुढे म्हणाली, “पूनम वयाने खूपच लहान होती. ती अवघ्या ३०-३२ वर्षांची होती. मी सध्या मुंबईत नाही अन्यथा मी तिला आदरांजली वाहण्यासाठी नक्कीच गेले असते. माणूस म्हणून पूनम खूपच सकारात्मक होती. प्रत्येकजण मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी काम करतो आणि तिने देखील कधी-कधी तसं केलं. पण, खऱ्या आयुष्यात ती अशी नव्हती. पूनमने कधीही तिच्या आजाराविषयी सांगितलं नाही. यावरून कल्पना करा की, ती किती खंबीर होती. कर्करोगासाठी उपचार आहेत पण, कदाचित तिला फारसा वेळ मिळाला नाही.”
हेही वाचा : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेची ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची; शेअर केलेला गोव्यातील व्हिडीओ
दरम्यान, ‘नशा’ या चित्रपटातून पूनम पांडेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय २०११ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी केलेल्या एका वक्तव्यामुळे पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती.