बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे सध्या तिच्या मृत्यूच्या अफवेमुळे चर्चेत आहे. या अफवेनंतर तिने सोशल मीडियावर कबूल केले होते की ती जिवंत आहे. यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती. आता पूनम पांडेबरोबर तिचा पती सॅम बॉम्बेसुद्धा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अभिनेत्री पूनम पांडे आणि तिच्या पतीविरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या पूनम पांडेने काही दिवसांपूर्वी तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सर्वाइकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची एक पोस्ट शेअर केली होती. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना आणि अनेक लोकांना मोठा धक्का बसला होता. या बातमीच्या दुसऱ्याच दिवशी पूनमने जाहीर केलं की ती सुखरुप आहे आणि जिवंत आहे. सर्वाइकल कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी तिने अशी पोस्ट शेअर केली होती.
पूनम पांडेच्या या कृत्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली असून मुंबईत राहणाऱ्या फैजान अन्सारीने तिच्याविरोधात १०० कोटींचा मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. फैजान अन्सारीने त्याच्या तक्रारीत पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांच्यावर आरोप केले आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी मृत्यूचे खोटे नाटक आणि कॅन्सरसारख्या आजाराचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न पूनमने केला आहे, असं त्याने म्हटलंय. “पूनमने आपल्या कृत्याने कोट्यवधी भारतीयांचा विश्वास तर मोडला आहेच परंतु लोकांची प्रतिमा खराब करण्याचं कामही केलं आहे,” असं फैजानच्या तक्रारीत म्हटलं आहे.
फैजानने पुढे सांगितलं तो स्वत: सिविल लाइन्स कानपुर कोर्टात जाऊन पूनम आणि तिच्या पतीविरुद्ध १०० कोटींचा मानहानीचा गुन्हा दाखल करत आहे. त्याची एक प्रत फैजानने कानपूरच्या पोलीस आयुक्तांनाही दिली आहे. या प्रकरणात तत्काळ पूनम पांडेसाठी अटक वॉरंट जारी करण्याचे आवाहन फैजानने केले आहे.