अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांनी १९६९ मध्ये ‘सात हिंदूस्तानी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर बॉलीवूडमध्ये त्यांनी स्वत:ची अँग्री यंग मॅन म्हणून ओळख निर्माण केली. ‘क्रोध’, ‘अंधा कानून’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘दो और दो पाँच’, ‘शक्ती’, ‘जंजीर’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. अमिताभ बच्चन वयाच्या ८२ व्या वर्षीही चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका निभावताना दिसतात. २०२४ ला प्रदर्शित झालेल्या ‘कल्की: २८९८ एडी’ या चित्रपटात त्यांनी केलेल्या कामाचे सगळीकडे कौतुक झाले. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचे होस्टिंग करताना दिसत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते या शोचे होस्टिंग करत आहेत. आता प्रसिद्ध दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ बच्चन जेव्हा परदेशात शूटिंग करायचे तेव्हा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी काय करत असत याबद्दल खुलासा केला आहे.

त्यावेळी मुंबईतून बँकॉकला…

अपूर्व लाखिया यांनी नुकतीच फ्रायडे टॉकीजला मुलाखत दिली. या मुलाखतीत २००५ साली प्रदर्शित झालेला ‘दो अजनबी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आठवण त्यांनी सांगितली. आतासारखे २० वर्षांपूर्वी इंटरनेट नव्हते. अपूर्व लाखिया यांनी म्हटले, “त्यावेळी मुंबईतून बँकॉकला सकाळी विमान जात असे आणि तेच विमान संध्याकाळी बँकॉकमधून परतत असे. तर अमिताभ बच्चन यांची सेक्रेटरी सगळी वर्तमानपत्रे सकाळच्या विमानाने बँकॉकला पाठवत असे. बँकॉकमध्ये ती वर्तमानपत्रे कोणीतरी घेत असे व अमिताभ बच्चन यांना देत असे. अमिताभ बच्चन ती सगळी वर्तमानपत्रे वाचत असत. पेपर वाचत असताना ते मार्कर घेऊन बसत. त्या वर्तमानपत्रातील नोट्स ते काढत असत आणि सायंकाळच्या विमानाने ती वर्तमानपत्रे परत पाठवत असत. रोज सकाळी बीग बी ३० मिनिटे वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते त्यांचा दिवस सुरू करीत असत”, अशी आठवण अपूर्व लाखिया यांनी सांगितली आहे.

पुढे अपूर्व लाखिया यांनी अमिताभ बच्चन यांना निद्रानाशाचा त्रास आहे, तरीही ते वेळेवरच उठतात. मात्र, असे असले तरी दुपारी ते अडीच तासाची विश्रांती घेतात, अशी आठवण सांगितली. याबरोबरच अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला ‘मुंबई से आया मेरा दोस्त’ या चित्रपटाचे जैसलमेरमध्ये शूटिंग होते, त्यावेळी तिथे दुष्काळ पडला होता. अभिषेकला भेटण्यासाठी जेव्हा अमिताभ बच्चन आले, त्यावेळी मोठा पाऊस पडला. त्यामुळे तेथील लोकांना अमिताभ बच्चन हे देवासमान वाटले होते. ५० हजारांचा समुदाय त्यांच्या पाया पडण्यासाठी जमा झाला होता, अशी आठवण अपूर्व लाखिया यांनी सांगितली आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर स्पर्धकांशी बोलताना अनेक आठवणी सांगतात. तसेच, त्यांच्या ब्लॉगमधून अनुभवही शेअर करतात. काही वेळा ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात.

Story img Loader