‘छावा'(Chhaava) चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळले. कलाकारांची वेशभूषा, दृश्यांचे चित्रीकरण अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. एकीकडे या चित्रपटाची प्रेक्षकांना भुरळ पडत असली तरी चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या लेझीम नृत्याच्या सीनवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून वादही निर्माण झाले होते. चित्रपटातील वादग्रस्त लेझीम नृत्याचा सीन काढला जाणार असल्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केले. आता यावर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार्‍या संतोष जुवेकर(Santosh Juvekar)ने एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाला अभिनेता?

अभिनेता संतोष जुवेकरने नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळत आहेत. या दृश्यावरून वाद निर्माण झाला होता. काही शिवभक्त नाराज झाले. तूदेखील या गाण्याचा भाग होतास. तू अभिनेता म्हणून नाही, तर प्रेक्षक म्हणून काय सांगशील? त्यावर बोलताना संतोष जुवेकरने म्हटले, “जे शिवभक्त आहेत, जे इतिहास तज्ज्ञ आहेत, त्या सगळ्यांचाच मान ठेवून, सगळ्यांच्या भावनांचा आम्ही सगळेच आदर करतो. मॅडॉक ही निर्मिती संस्था किंवा लक्ष्मणसर हे सगळे चार वर्षांपासून या कथेवर अभ्यास, रिसर्च करीत आहेत. ते, त्यांचे लेखक म्हणजे सगळीच टीम कॉस्च्युम डिझाइनपासून ते सेट डिझायनिंगपर्यंत सगळ्यांनीच अभ्यास केला आहे. आपल्या राजावर चित्रपट बनवताना त्यांनी शिवभक्त म्हणूनच काम केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे भक्त म्हणूनच त्यांनी काम केलंय. त्यांनाही तीच भावना आहे की, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लोकांसमोर यावा. आजच्या पिढीला कळावा. लेझीम ही आपलं पारंपरिक नृत्य आहे, ती संस्कृती आहे.”

याबद्दल अधिक बोलताना अभिनेत्याने म्हटले, “आज अनेक ठिकाणी गणेशोत्सवात, शिवजयंती उत्सवात लेझीम खेळले जाते. ते जे गाणं आहे, ट्रेलर आल्यानंतर तुम्ही फक्त गाणं ऐकलं नाही किंवा तुम्हाला त्याची पार्श्वभूमी माहीत नाही. ती पार्श्वभूमी अशी आहे की, बुराणपूरचा पहिला हल्ला, पहिली लढाई जिंकल्यानंतर महाराज आपल्या मावळ्या व सरदारांबरोबर पुन्हा रायगडावर येतात. तेव्हा महाराणी येसूबाई, सरदारांच्या पत्नी तेथे येतात आणि त्यांना ओवाळतात. ते विजय मिळवून परत आल्यानंतर त्या त्यांचं स्वागत करीत आहेत. ते जे गाणं आहे, ते विजय उत्सवाचं आहे. त्या लढाईनंतर राज्याभिषेक झाला. म्हणजे युवराज आता राजे झाले. त्यामुळे मला वाटतं तो विजयोत्सव आहे आणि तो उत्सव केवळ लढाईचा नाही, तर आज माझ्या महाराष्ट्राला, माझ्या राज्याला एक राजा मिळाला, तो आनंद उत्सव आहे. तर त्या आनंद उत्सवात ते लेझीम नृत्य आहे. तर काही लोकांना ते पटलं नसेल ते ठीक आहे. आमच्या दिग्दर्शकांनी त्यांना जो निर्णय योग्य वाटतो, तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पण मला खात्री आहे, चित्रपट पाहिल्यानंतर काही ठिकाणी बोलतील की नाही, आमचं चुकलं”, असे म्हणत संतोषने त्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, या चित्रपटात संतोष जुवेकरसह इतरही मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. विकी कौशलने चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे; तर बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.