Yashraj Mukhate Marriage: कोरोना काळात स्वतःच्या वेगळ्या शैलीमुळे घराघरात पोहोचलेला आणि प्रसिद्ध झालेला संगीतकार, गायक म्हणजे यशराज मुखाटे. संवादावरून मजेशीर गाणी बनवून त्याने प्रेक्षकांच्या मनात एकच वेगळं स्थान निर्माण केलं. ‘रसोडे में कौन था?’ , ‘त्वाड्डा कुत्ता टॉमी, साड्डा कुत्ता, कुत्ता’ अशी बरीच मजेशीर गाणी त्याची जगभरात हिट झाली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. असा हा प्रसिद्ध यशराज मुखाटे आज (२८ फेब्रुवारी) लग्नबंधनात अडकला आहे. त्याने ही आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून अनेक कलाकार लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवताना दिसत आहेत. आता यादीत यशराज मुखाटेचं नाव सामील झालं आहे. त्याच्या लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
हेही वाचा – मिस्टर अँड मिसेस कलरफूल! पूजा सावंत अडकली लग्नाच्या बेडीत, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
यशराजने नोंदणी पद्धतीत गर्लफ्रेंड अल्पनाशी लग्न केलं आहे. लग्नाचा पहिला फोटो शेअर करत यशराज म्हणाला की, आज दोन मोठ्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे अल्पना आणि मी नोंदणी पद्धतीत लग्न केलं. तर दुसरी म्हणजे माझं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे, ‘मन धागा’. याची लिंक बायोमध्ये दिली आहे.
दरम्यान, यशराजच्या या पोस्टवर बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी प्रतिक्रियेद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शेहनाज गिल, सुप्रिया पिळगांवकर, क्रांती रेडकर, अर्चना निपाणकर, कुशा कपिला, आदिती राव, मिथिला पालकर, दिप्ती देवी अशा अनेक कलाकारांनी यशराज व अल्पनाला शुभेच्छा दिल्या आहेत.