काही दिवसांपासून घिबली हा ट्रेंड(Ghibli-Style AI Art trend) सुरू असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर अगदी सामान्य ते नामांकित, सेलिब्रिटींनादेखील या ट्रेंडची भुरळ पडली आहे. सर्व जण त्यांचे कार्टूनमधील फोटो पाहून आनंदी होत असल्याचे दिसत आहे. सगळेच या ‘घिबली’ ट्रेंडच्या प्रेमात असतानाच प्रसिद्ध गायक संगीतकार विशाल ददलानीने मात्र मी या घिबली ट्रेंडचा वापर करणार नाही, एआयनं कलाकारांची ही कला चोरली, असे म्हटले आहे.

“मला माफ करा…”

विशाल ददलानीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘घिबली’ ट्रेंडचा वापर करून, त्याचे फोटो बनवू नयेत. तसेच, त्यामध्ये त्याला टॅग करू नये, अशी विनंती त्याने त्याच्या चाहत्यांना केली आहे. विशाल ददलानीने पुढे लिहिले, “तुम्ही ‘घिबली’ स्टाईलचा वापर करून माझे जे फोटो बनवीत आहात, ते मी पोस्ट करणार नाही. मला माफ करा. एका कलाकारानं आयुष्यभर केलेल्या कामाची चोरी एआयनं केली आहे. त्याचं समर्थन करण्यास मी तयार नाही.” पुढे त्याने यामुळे पर्यावरणाचंदेखील मोठं नुकसान होत असल्याचे म्हटले. गायक त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला, “हे पर्यावरणासाठीदेखील हानिकारक आहे. कृपया असे फोटो बनवणं बंद करा”, असे लिहीत ‘घिबली’ स्टाईलला विरोध दर्शवला आहे.

बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांचे घिबली स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामध्ये कियारा अडवणी, परिणीती चोप्रा यांच्यासह बॉलीवूडचे बादशाह म्हणजेच अमिताभ बच्चन यांनीदेखील सोशल मीडियावर त्यांचे घिबली स्टाईलमधील फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळाले. बॉलीवूडसह मराठी चित्रपट व टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी त्यांचे हे फोटो शेअर केले आहेत. काही चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांचे फोटो घिबली स्टाईलमध्ये बनवून, त्यांना सोशल मीडियावर टॅग केल्याचे दिसत आहे.

चॅटजीपीचा वापर करून हे फोटो तयार करता येतात. हे फोटो कार्टूनसारखे दिसत असल्याने स्वत:ला एका नव्या रूपात पाहून लोकांना आनंद होत असल्याचे दिसत आहे. अनेक जण या घिबली स्टाईलने फोटो तयार करीत सोशल मीडियावर शेअर करीत असल्याचे दिसत आहे. घिबली स्टाईल हे फोटो जपानमधील अॅनिमेशन स्टुडिओने तयार केले आहेत.