बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती व उद्योगपती राज कुंद्रा याच्याविरोधात पॉर्नोग्राफी प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून शर्लिन चोप्रा, राज कुंद्रा व पूनम पांडे यांच्याविरोधात हे ४५० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अश्लील कन्टेंट बनवून ओटीटीवर प्रसारित केल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
राज कुंद्रा, पूनम पांडे, शर्लिन चोप्रासह निर्माते मीता झुनझुनवाला व कॅमेरामन राजू दुबे विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अश्लील व्हिडीओ शूट केले असल्याचं यात म्हणण्यात आलं आहे. एप्रिल २०२१मध्ये राज कुंद्राविरोधात पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. अश्लील व्हिडीओचे चित्रीकरण करुन ते प्रसारित करण्याचा ठपका राज कुंद्रावर ठेवण्यात आला होता. २०२१च्या फेब्रुवारी महिन्यात एका बंगल्यावर छापेमारी करण्यात आल्यानंतर अश्लील रॅकेट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
हेही वाचा >> “दाक्षिणात्य कलाकारांकडून आपण…” मराठी निर्माते, कलाकारांचे राज ठाकरेंनी टोचले कान; कारण ठरलं ‘हिंदी’
“राज कुंद्राने अश्लील व्हिडीओ बनवून ते प्रसारित करण्यासाठी अनेकांची मदत घेतली आहे. यातून त्याने पैसेही कमावले आहेत. हे बेकायदेशीर आहे हे माहीत असूनही अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या मॉडेलच्या तो शोधात होता”, असं पोलिसांनी म्हटलं होतं. मॉडेल पूनम पांडेवरही याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम पांडेवर स्वत:च्याच मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ चित्रीत करुन ‘द पूनम पांडे’ या अॅपवर ते अपलोड करुन राज कुंद्राच्या मदतीने त्याद्वारे पैसे कमावल्याचा आरोप आहे.
हेही वाचा >> Drishyam 2 Box Office Collection: चौथ्या दिवशी ‘दृश्यम २’च्या कमाईत घट; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला १९ जुलै २०२१मध्ये अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांनंतर सप्टेंबर २०२१मध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. तेव्हापासून राज कुंद्रा मीडियासमोरही चेहरा लपवत असल्यामुळे अनेकदा तो चर्चेत असतो.