दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास सध्या अयोध्या शहरामध्ये आहे. त्याच्या ‘आदिपुरुष’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रविवारी रात्री प्रदर्शित झाला. चित्रपटाची संपूर्ण टीम या प्रदर्शनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्यामध्ये पोहोचली होती. शरयू नदीच्या काठावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तो या चित्रपटामध्ये प्रभू राम यांच्या भूमिकेत आहे. क्रिती सेनॉनने जानकीची, तर सैफ अली खानने लंकेशची व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याशिवाय देवदत्त नागे या मराठमोळ्या अभिनेत्याने चित्रपटामध्ये महत्त्वाचे पात्र साकारले आहे.
दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा दुसरा हिंदी, तर पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. त्यांनी याआधी अजय देवगनसह ‘तान्हाजी’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाला ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वात्कृष्ट लोकप्रिय चित्रपट हा पुरस्कार मिळाला. ‘तान्हाजी’नंतर ओम राऊत यांनी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची घोषणा केली. काही दिवसापूर्वी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. रविवारी रात्री या चित्रपटाचा काही सेकंदांचा टीझर प्रदर्शित झाला.
आदिपुरुषच्या टीझरबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. चित्रपटाच्या व्हीएफएक्सनी चाहत्यांना निराश केले आहे. काहींनी टीझरमधील काही सीन्स हुबेहूब ‘मार्व्हल’चे चित्रपट, ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘हॅरी पॉटर’ सारख्या चित्रपटातील सीन्सची कॉपी आहेत असे म्हटले आहे. एका ट्वीटर यूजरने टीझरमधील व्हीएफएक्सची तुलना तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘रामायण: द लेजेन्ड ऑफ प्रिन्स राम’ या जपानी अॅनिमेटेड चित्रपटाशी केली आहे. दुसऱ्या यूजरने यापेक्षा रामानंद सागर यांनी बनवलेली ‘रामायण’ मालिका चांगली होती असे म्हटले आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स व्हिडीओ गेमपेक्षा वाईट असल्याचे ट्वीट केले आहे. सध्या ट्वीटरवर व्हीएफएक्स या मुद्यावरुन चित्रपटाला ट्रोल केले जात आहे.




‘बाहुबली’नंतर प्रभासने ‘साहो’ आणि ‘राधेश्याम’ असे दोन बिगबजेट चित्रपट केले. या दोन्ही चित्रपटांना अपेक्षित प्रमाणामध्ये यश मिळाले नाही. त्यामुळे त्याचे चाहते काहीसे निराश झाले होते. ‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाकडून त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहेत.