‘आदिपुरुष’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन या चित्रपटामध्ये सीतेच्या भूमिकेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. येत्या १६ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगची सध्या चांगलीच चर्चा आहे.
हेही वाचा- “कंगनाने जे काही सांगितलं ते सगळं…”; मानहानीच्या प्रकरणात जावेद अख्तर यांचा न्यायालयासमोर जबाब
बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. केवळ दोन दिवसांमध्येच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाची ४५ हजार तिकिटे विकली गेली आहेत. PVR वरून या चित्रपटाची २१ हजार ५०० तिकिटे विकली गेली आहेत. तर आयनॉक्समध्ये या चित्रपटाची १४ हजार ५०० तिकिटे विकली गेली आहेत. तसेच सिनेपोलीसमध्ये ९ हजार तिकिटे विकली गेली आहेत. आता या चित्रपटाची एकूण ४५ हजार तिकिटे विकली गेली आहेत. तसेच गुरुवारअखेर ३.५० ते ४ लाख तिकिटांची विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधूनच दोन कोटींच्या आसपास कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होणार, अशी चिन्हं दिसत आहेत.
चित्रपटाच्या प्रत्येक शोदरम्यान एक सीट हनुमानासाठी राखीव
या चित्रपटाच्या प्रत्येक शोदरम्यान एक सीट हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमत थोडी जास्त असेल असं बोललं जात होतं. परंतु ‘टी-सीरिज’ कंपनीने एक ट्वीट करत याबाबत भाष्य केलं आहे. ” ‘आदिपुरुष’च्या तिकिटांच्या किमतीबद्दल काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. शो दरम्यान हनुमानासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमत जास्त असेल असं बोललं जाऊ लागलं आहे. मात्र तसं काहीही नाही. हनुमानासाठी राखीव सीटच्या बाजूच्या सीटच्या तिकिटाची किंमतही इतर तिकिटांच्या किमतीइतकीच असेल,” असं त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे.