प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत आला आहे. या चित्रपटामधील कलाकार तसेच कलाकारांच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबरीने राजकीय क्षेत्रामधूनही या चित्रपटाला विरोध होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ‘आदिपुरुष’चा टीझर पाहिल्यानंतर काही कलाकार मंडळींनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. आता ‘रामायण’ या मालिकेमध्ये लक्ष्मणची भूमिका साकारलेले दिग्गज अभिनेते सुनील लहरी यांनी ‘आदिपुरुष’चा टीझर पाहून प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले सुनील लहरी?
‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील लहरी यांनी ‘आदिपुरुष’बाबत आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “निर्माते-दिग्दर्शकांनी सध्या चित्रपटामधील भूमिकांची ओळख करून दिली आहे. त्यांनी अजूनही असं काही दाखवलेलं नाही की ज्यामुळे मी अस्वस्थ होईन. मला असं वाटतं की चित्रपट चर्चेत राहावा म्हणून वाद निर्माण केले जात आहेत.”
पुढे ते म्हणाले, “या देशामध्ये अजून कोणताच मुर्खपणा सहन केला जाणार नाही एवढंच मी निर्मात्यांना तसेच प्रेक्षकांना सांगू इच्छितो. आपला धर्म, आपल्या भावना, आपण ज्यांची पूजा करतो त्याच्याबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चा आता सहन केल्या जाणार नाहीत.”
आणखी वाचा – ट्रोलिंग, नकारात्मक चर्चा अन्…; प्रभास-सैफ अली खानचा ‘आदिपुरुष’ प्रदर्शनापूर्वीच बॉयकॉट करण्याची मागणी
‘आदिपुरुष’चा टीझर पाहिल्यानंतर त्यामध्ये काही गैर नसल्याचं सुनील लहरी यांचं म्हणणं आहे. याआधी चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊतनेही होणाऱ्या ट्रोलिंगबाबत स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं होतं. चित्रपटाबाबत आपलं मत मांडण्यासाठी प्रेक्षक अधिक घाई करत असल्याचं ओमने म्हटलं होतं.