प्रभासच्या ‘आदिपुरुष’बद्दल सोशल मीडियावर बरंच काही बोललं जात आहे. एकूणच या चित्रपटाचं टीझर आणि त्यात दाखवलेल्या गोष्टी लोकांना न पटल्याने त्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली आहे. सध्या ‘आदिपुरुष’ला होणारा विरोध पाहता या चित्रपटाचं भवितव्य सध्यातरी अंधारातच आहे. आता यात आणखी भर टाकली आहे ती साऊथ सुपरस्टार विजयने. ‘आदिपुरुष’बरोबरच विजयचा ‘वारीसु’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रभास आणि ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा पुढच्या वर्षी १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर विजयचा ‘वारीसू’ हा चित्रपट लगेच ३ दिवसांनी पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचं समोर आलं आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. लवकरच या चित्रपटाचा टीझर किंवा ट्रेलर लोकांना पाहायला मिळेल असं आश्वासनही ‘वारीसु’च्या निर्मात्यांनी दिलं आहे.

आणखी वाचा : ‘राम सेतु’ला बॉक्स ऑफिसवर थंड प्रतिसाद; अक्षयच्या आधीच्या चित्रपटांपेक्षाही कमी झालं ॲडव्हान्स बुकिंग

विजयचा हा चित्रपट तामीळ तसेच तेलुगूमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे जानेवारी २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये घमासान बघायला मिळणार हे नक्की आहे. नुकतंच ‘वारीसु’चं एक पोस्टर समोर आलं आणि यातील विजयचा लूक प्रेक्षकांना चांगलाच आवडला आहे. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

विजयचा नुकताच आलेला ‘बिस्ट’ हा चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला होता. शिवाय त्याच्या ‘मास्टर’ या चित्रपटावरही टीका झाली होती. त्यामुळे विजयच्या चाहत्यांसाठी ‘वारीसु’ अत्यंत महत्त्वाचा आहे. यामध्ये विजयबरोबर रश्मिका मंदाना, सरथकुमार, प्रकाश राज हे कलाकारही आपल्याला बघायला मिळणार आहेत. याबरोबरच या चित्रपटात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही एका छोट्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात या केवळ चर्चा आहेत चित्रपटांच्या निर्मात्याकडून अजूनतरी अशी कोणतीच घोषणा केली गेली नाहीये.