‘अॅनिमल’ आणि ‘सॅम बहादुर’नंतर बॉक्स ऑफिसवर आणखी एक जबरदस्त मुकाबला पाहायला मिळणार आहे. शाहरुख खानचा ‘डंकी’ व दाक्षिणात्य स्टार प्रभासचा ‘सालार’ हे दोन्ही बिग बजेट चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. यावरून सध्या दोन्ही सुपरस्टार्सच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चढाओढ पाहायला मिळत आहे. दोन्ही चित्रपटांना मिळणाऱ्या स्क्रीनवरुन सध्या चांगलीच स्पर्धा पाहायला मिळत आहे.
शाहरुख खानचा ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने उत्तरेकडीन राज्यात शाहरुखच्या ‘डंकी’ला अधिक स्क्रीन देण्यात आल्या असल्याचं सांगितलं जात आहे. ‘पिंकव्हीला’च्या रीपोर्टनुसार उत्तरेकडील राज्यात शाहरुख खानच्या ‘डंकी’ला ४० टक्के शोज देण्यात आले असून ‘सालार’ला निव्वळ ३०% शोज देण्यात आले आहेत. तर हॉलिवूडपट ‘अॅक्वामॅन २’ला १२% शोज दिले गेले असून उर्वरित १०% शोज रणबीरच्या ‘अॅनिमल’साठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
स्क्रीन शेअरिंगच्या या आकडेवारीमुळे प्रभास नाराज आहे अन् लवकरच तो शाहरुखशी या संदर्भात भेट घेऊन काही तोडगा काढता येतो की नाही याबद्दल चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही चित्रपटांना ५०% स्क्रीन्स मिळायल्या हव्यात असा आग्रह प्रभासचा असल्याचा ‘झूम’च्या रीपोर्टमधून समोर आलं आहे. यासाठीच प्रभास शाहरुख खानची लवकरच भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा : अखेर दोन महिन्यांनी समोर आलं मॅथ्यू पेरीच्या मृत्यूचं कारण, हॉट टबमध्ये बुडून नव्हे तर…
‘सालार’च्या कोणत्याही प्रमोशनमध्ये प्रभास सहभागी नसला तरी पडद्यामागून त्याला जेवढं शक्य आहे तितकी मेहनत तो चित्रपटाचा फायदा व्हावा यासाठी घेताना दिसत आहे. दोन्ही चित्रपट आणि त्यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा असला तरी हे दोन्ही चित्रपट आमने-सामने आल्याने त्यांच्या कमाईवर नक्कीच परिणाम होऊ शकतो यात कोणाचंच दुमत नाही.
‘सालार’चे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. या चित्रपटात प्रभासबरोबर पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू आणि टिनू आनंद हे कलाकार काम करत आहेत. हा चित्रपट २२ डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. ‘डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. यामध्ये शाहरुख खानबरोबर तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी हे कलाकार या प्रमुख भूमिकेत आहेत. ‘डंकी’ २१ डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होत आहे.