अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा ‘हड्डी’ हा चित्रपट गेले काही दिवस खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन तृतीयपंथीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. नुकताच त्याने त्याचा या चित्रपटातील स्त्री वेशातला एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तो हिरवी साडी, नाकात चमकी, कपाळावर मोठी टिकली, भडक लिपस्टिक अशा लूकमध्ये दिसला. नवाजुद्दीनच्या या फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. या फोटोत नवाजुद्दीनबरोबर एक मराठी अभिनेत्रीही दिसली. या चित्रपटाच्या माध्यमातून ती नवाजुद्दीनबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर दिसणारी अभिनेत्री म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रान्सजेंडर अभिनेत्री गंगा. गंगाने तिच्या कामाने आणि स्वभावाने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘कारभारी लयभारी’ या मालिकेत तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. ‘युवा डान्सिंग क्वीन’ या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेतही ती दिसली. आता ती नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘हड्डी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाचा : प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘दृश्यम २’ची रेकॉर्डब्रेक कमाई, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
नवाजुद्दीनने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टरमध्ये त्याच्याबरोबर गंगाही दिसत आहे. या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. परंतु या चित्रपटात तिची भूमिका नेमकी काय आणि कशी असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नवाजुद्दीनने शेअर केलेला पोस्टरमध्ये तिला पाहून तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा : “महिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव
दरम्यान ‘हड्डी’ या चित्रपटात नवाजुद्दीन स्त्री आणि तृतीयपंथी अशा दोन्ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. जवळपास ४ वर्षांपासून नवाजुद्दीन या चित्रपटावर काम करत होता. हा चित्रपट येत्या २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.