गेल्या काही महिन्यात अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक घटनांवर आधारित प्रदर्शित झाले. त्यापैकी अनेक चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. लवकरच रामायणावर आधारित ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगत असतानाच आता अयोध्येच्या राम मंदिरावर आधारित चित्रपट तयार करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे.
गेली अनेक वर्ष अयोध्या येथील राम मंदिर हा विषय चांगला चर्चेत आहे. तिथे आता राम मंदिर बनवण्याचं काम सुरू आहे. हे मंदिर लवकरच बनून पूर्ण होणार असतानाच रामजन्मभूमीचा पाचशे वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे.
आणखी वाचा : Video: लेकीच्या साखरपुड्यात आमिर खानचा ‘पापा कहते हैं’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याची जबाबदारी प्रसिद्ध लेखक आणि चित्रपट सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना देण्यात आली आहे. या कार्यात त्यांच्याबरोबर ६ सदस्यांची टीम काम करणार आहे. राम मंदिर समितीनेही हा चित्रपट बनवण्यास मान्यता दिली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचाही सहभाग असणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन सूत्रधाराच्या भूमिकेत असून या चित्रपटाला ते आजाव देणार आहेत. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन आणि प्रसून जोशी कोणतीही फी घेतली नसल्याचंही बोललं जात आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत.
रामजन्मभूमीच्या इतिहासावर चित्रपट बनविण्यासाठी रामजन्मभूमी परिसरातच एका बैठकीचे अयोजन करण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी पार पडलेल्या दोन दिवसांच्या बैठकीत चित्रपट तयार करण्याच्या योजनेचे अंतिम निर्णय घेण्यात आले. लवकरच या चित्रपटाचे काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’चे सचिव सच्चिदानंद जोशी हे या चित्रपटादरम्यान समन्वयक म्हणून काम करणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.