अभिनेता प्रतीक बब्बर हा त्याचे चित्रपट, त्याचं खासगी आयुष्य, आई स्मिता पाटीलबरोबरचं त्याचं नातं अशा विविध कारणांमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो त्याच्या एका वेगळ्या निर्णयामुळे चर्चेत आला आहे. प्रतीकने त्याचं नाव बदलायचा निर्णय घेतला आणि यामुळेच सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा आहे.
प्रतीक यापुढे प्रतीक पाटील बब्बर असं नाव लावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचं नाव बदललं आहे तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही नाव बदलल्याचं समोर आलं आहे. प्रतीकने इमरान खान आणि जिनीलिया डिसूझाबरोबर ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
आणखी वाचा : “बाबांना लोक मूर्ख बनवायचे…” सुनील दत्त यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल संजय दत्तने मांडलेलं स्पष्ट मत
प्रतीक हा अभिनेत्री स्मिता पाटील अन् अभिनेते राज बब्बर यांचा एकुलता एक मुलगा. ‘डीएनए’शी संवाद साधताना प्रतीकने नाव बदलण्यामागील कारण सांगितलं आहे. तो म्हणाला, “माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आणि आजी आजोबांच्या आशीर्वादाने मी माझ्या नावाबरोबर माझ्या आईचं आडनाव जोडायचं ठरवलं आहे. हा निर्णय थोडा भावनिक आणि थोडा अंधश्रद्धेशी जोडलेला आहे. माझं नाव जेव्हा मोठ्या पडद्यावर झळकेल तेंव्हा माझ्या आईच्या योगदानाची मला आणि तिच्या लाखों चाहत्यांना आठवण व्हावी, तिचा वारसा मी जपतो आहे हे लक्षात राहावं अशी माझी इच्छा आहे.”
पुढे प्रतीक म्हणाला, “यावर्षी आईला आपल्यातून जाऊन ३७ वर्षं होतील, पण आजही तिला कुणीच विसरलेलं नाही, मी तिला विस्मृतीत जाऊ देणार नाही. माझ्या या नवीन नावाच्या माध्यमातून स्मिता पाटील या कायम आपल्यात असतील.” लग्नानंतर १९८६ साली स्मिता पाटील यांनी प्रतीकला जन्म दिला. वडील रज बब्बर यांच्याशी नातं फारसं चांगलं नसल्याने प्रतीकचा सांभाळ त्याच्या आईच्या आई वडिलांनी केला.