Prateik Babbar Wedding : बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) व्हॅलेंटाईन डेला लग्न केलं. प्रतीकने त्याची दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या मुंबईतील घरी एका खासगी समारंभात दुसरं लग्न केलं. पण, प्रतीकने त्याचे वडील राज बब्बर आणि सावत्र भावंडं आर्या आणि जुही यांना लग्नाचं आमंत्रण दिलं नाही. आर्यने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
आर्य म्हणाला की प्रतीकला त्याच्या आयुष्यातील सर्वात खास दिवसासाठी कुटुंबियांना आमंत्रित करावं वाटलं वाटलं नसेल तर मग एक कुटुंब म्हणून हे आमचं अपयश आहे. त्याने लग्नात बोलावलं नाही, यामुळे वडील राज बब्बर दुखावले आहेत, असंही आर्यने नमूद केलं. प्रतीक हा राज आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. तर आर्य आणि जुही ही राज आणि नादिरा बब्बर यांची मुलं आहेत.
राज बब्बर यांचा मोठा मुलगा आर्य बब्बर त्याचा सावत्र भाऊ प्रतीक बब्बरबद्दल म्हणाला, “कुठेतरी एक कुटुंब म्हणून आम्ही कमी पडलो.” प्रतीकने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न केलं. या लग्नात त्याची पत्नी प्रिया बॅनर्जीचे कुटुंबीय होते व दोघांचे काही जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. मात्र बब्बर कुटुंबातील एकाही सदस्याला प्रतीकने या लग्नाचं निमंत्रण दिलं नाही.
प्रतीकने स्मिताजींना दुखावले – आर्य बब्बर
आर्य म्हणाला, “आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना, माझी आई (नादिरा बब्बर), माझी बहीण (जुही बब्बर) किंवा मला लग्नाला न बोलावणं समजू शकतो. कदाचित आम्ही एक कुटुंब म्हणून कुठेतरी कमी पडलो असू. पण आम्ही त्याला कधीही सावत्र भाऊ मानलं नाही. पण ठिके. कदाचित, आमच्याकडून काही चूक झाली असेल. पण पप्पा? पप्पांना लग्नाचं निमंत्रण दिलं नाही. ते त्याचेही वडील आहेत. तो असं कसं करू शकतो? पप्पा खूप दुखावले आहेत. असं करून प्रतीकने त्याच्या आई स्मिता पाटीलजींनाही दुखावलं आहे. जर त्याने क्षणभर याचा विचार केला तर त्याला कळेल की त्याची आई, ज्यांचा तो खूप आदर करतो आणि प्रेम करतो; त्यांनाच त्याने दुखावलं आहे.”
![pratiek babbar priya banerjee](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/pratiek-babbar-priya-banerjee.jpg?w=443)
आम्हाला भीती वाटतेय की…
“आम्ही नेहमीच प्रतीकला आमच्या कुटुंबाचा एक भाग मानलं आहे. आमच्या घराचे दरवाजे त्याच्यासाठी सदैव उघडे असतात. तो वैवाहिक जीवनात खूश असेल, अशी मी आशा करतो. तो दोन दिग्गज कलाकारांचा मुलगा आहे. दुसरा रणबीर कपूर बनण्याचे कौशल्य त्याच्यात आहे, असं मला नेहमीच वाटत होतं, पण आता तो कुठेतरी भरकटला आहे. आम्हाला भीती वाटतेय की कोणीतरी त्याला चुकीचा सल्ला देत आहे,” असं आर्य बब्बर प्रतीकबद्दल म्हणाला.