Prateik Babbar Wife Priya Banerjee : अभिनेता प्रतीक बब्बरने शुक्रवारी, व्हॅलेंटाईन डेला (१४ फेब्रुवारी २०२५) दुसरं लग्न केलं. गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीबरोबर तो दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या मुंबईतील घरात लग्नबंधनात अडकला. या लग्नात प्रिया बॅनर्जीचे कुटुंबीय उपस्थित होते, तसेच स्मिता पाटील यांच्या माहेरची मंडळीदेखील होती. मात्र बब्बर कुटुंबाला या लग्नाचं निमंत्रण नव्हतं. प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य बब्बरने याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. आता प्रतीकची पत्नी प्रिया बॅनर्जीने बब्बर कुटुंबाला लग्नात न बोलावण्याबद्दल मौन सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रिया बॅनर्जी एका मुलाखतीत लग्नाबद्दल म्हणाली, “आम्ही ज्याप्रमाणे लग्न करायचं स्वप्न पाहिलं होतं, कल्पना केली होती, अगदी त्याचप्रमाणे आमचा लग्नाचा दिवस होता. हा दिवस खूप खास व खासगी होता. त्यादिवशी आमचं ज्यांच्यावर सर्वाधिक प्रेम आहे, ते लोक एकाच छताखाली होते. आम्ही रॉक क्लिफ येथे लग्न केलं, हे प्रतीक आईचं घर आहे, तिथे लग्न करणं ही सर्वात खास गोष्ट आहे. हे घर त्यांनी प्रतीकसाठी विकत घेतलं होतं, जेणेकरून त्या त्याच्याबरोबर राहू शकतील; पण दुर्दैवाने तसं झालं नाही. आम्हाला वाटतं की हे त्यांनी आम्हाला दिलेलं एक गिफ्ट आहे, आम्ही या घरात लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती आणि आम्ही तेच केलं.”

प्रतीकचे वडील, ज्येष्ठ अभिनेते व राजकीय नेते राज बब्बर आणि बब्बर कुटुंबीय या लग्नाला उपस्थित नव्हते. त्याबद्दल प्रिया बॅनर्जीने भाष्य केलं आहे. “आमच्या लग्नात आमच्या कुटुंबातील कोणतेही सदस्य अनुपस्थित नव्हते. कुटुंबातील काही लोक लग्नात अनुपस्थित होते, अशा अफवा का पसरत आहेत; हे मला माहीत नाही. लग्नात माझे आई-वडील, प्रतीकला वाढवणाऱ्या त्याच्या मावशी, आजी-आजोबा आणि इतर लोक जे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते सगळे या लग्नात होते. आमच्या लग्नात कोणीही अनुपस्थित नव्हतं,” असं प्रिया बॅनर्जी म्हणाली.

प्रिया बॅनर्जी व प्रतीक बब्बर (फोटो – इन्स्टाग्राम)

आर्य बब्बरने व्यक्त केलेली नाराजी

“आमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना, माझी आई (नादिरा बब्बर), माझी बहीण (जुही बब्बर) किंवा मला लग्नाला न बोलावणं समजू शकतो. कदाचित आम्ही एक कुटुंब म्हणून कुठेतरी कमी पडलो असू. पण आम्ही त्याला कधीही सावत्र भाऊ मानलं नाही. पण ठिके. कदाचित, आमच्याकडून काही चूक झाली असेल. पण पप्पा? पप्पांना लग्नाचं निमंत्रण दिलं नाही. ते त्याचेही वडील आहेत. तो असं कसं करू शकतो? पप्पा खूप दुखावले आहेत. असं करून प्रतीकने त्याच्या आई स्मिता पाटीलजींनाही दुखावलं आहे. जर त्याने क्षणभर याचा विचार केला तर त्याला कळेल की त्याची आई, ज्यांचा तो खूप आदर करतो आणि प्रेम करतो; त्यांनाच त्याने दुखावलं आहे,” असं आर्य बब्बर प्रतीकच्या लग्नाबद्दल म्हणाला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prateik babbar wife priya banerjee breaks silence on not inviting raj babbar family for wedding hrc