‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून मुग्धा वैशंपायन घराघरांत लोकप्रिय झाली. सध्या ती विविध ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम करते. गायिकेने नुकतीच शैक्षणिक आयुष्यात उंच भरारी घेत भारतीय शास्त्रीय संगीतात पदव्युत्तर पदवी संपादन केली. या अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळवून मुग्धाने मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. या कामगिरीमुळे सध्या गायिकेवर सध्या कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
मुग्धाचा पती व गायक प्रथमेश लघाटेने लाडक्या बायकोसाठी खास पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. दोघेही वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट्स त्यांच्या चाहत्यांना देत असतात. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक पदवी प्रदान (दीक्षान्त) समारंभात मुग्धाला हे सुवर्ण पदक प्रदान करण्यात आल्यानंतर प्रथमेशच्या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : आनंद महिंद्रा यांनी घेतली आयपीएस मनोज शर्मा व आयआरएस श्रद्धा जोशी या जोडप्याची भेट; म्हणाले, “हे खरे…”
प्रथमेश मुग्धाचा पदवी स्वीकारतानाचा फोटो शेअर करत लिहितो, “माझ्या प्रिय बायकोचं खूप खूप अभिनंदन! आम्हाला तुझा खूप अभिमान आहे.” सतत गाण्याचे कार्यक्रम, वैयक्तिक आयुष्यात लग्न, दौरे या सगळ्या गोष्टी सांभाळून गायिकेने एवढं मोठं यश मिळवल्याने सध्या मराठी कलाविश्वातून मुग्धावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
दरम्यान, गायिका मुग्धा वैशंपायन हिने मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातून शैक्षणिक वर्ष २०२१-२३ अंतर्गत संगीत अधिस्नातक (एम.एफ.ए) (गायन) हा दोन वर्षीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला आणि सर्वाधिक गुण प्राप्त करीत दिवंगत ‘श्री रंजनकुमार एच. वैद्य’ या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. मुग्धाची अंतिम परीक्षा एप्रिल – २०२३ मध्ये पार पडली होती.