सध्या भारतीय सिनेसृष्टीत एखादी अभिनेत्री आली, प्रेक्षकांना आवडली की तिला सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून घोषित केले जाते. दिशा पटाणी, रश्मिका मंदाना आणि आता तृप्ती डिमरी या ‘नॅशनल क्रश’ झाल्या. मात्र, २००० च्या दशकात ‘नॅशनल क्रश’ ही संकल्पना नसतानाही अनेकांना आवडणारी अभिनेत्री म्हणजे ‘मोहब्बतें’फेम प्रीती झांगियानी. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या प्रीती झांगियानीला आजही चित्रपटप्रेमी विसरलेले नाहीत. मल्याळम चित्रपट ‘माझविल्लू’ (१९९९) मधून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली आणि पुढे तमिळ भाषेसह अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, तिला खरी ओळख ‘मोहब्बतें’ या चित्रपटाने मिळवून दिली. याच चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करत असतानाचा अनुभव कसा होता हे तिने सांगितले आहे. प्रीतीने सांगितले की, तिने अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या एका वस्तूला नकार दिला, ज्याचे तिला अजूनही खूप वाईट वाटते.
दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा ‘मोहब्बतें’ (२०००) हा सर्वात मोठा हिट ठरला. शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रीतीला मोठी ओळख दिली. या सिनेमात तिची भूमिका अनेक सपोर्टिंग कॅरेक्टर्समधील (सहायक पात्र) एक होती, तरीही तिने प्रेक्षकांवर प्रभावी छाप सोडली आणि तिच्या करिअरला चालना मिळाली.
हेही वाचा..अभिनेता परवीन डबास अपघात : पत्नी प्रीती झांगियानीने दिली प्रकृतीची माहिती
अलीकडेच प्रीती झांगियानीने ‘मोहब्बतें’ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या आठवणी शेअर केल्या. अमिताभ यांच्यासमोर ती सुरुवातीला थोडी घाबरलेली होती, हे मान्य करत तिने एक किस्सा सांगितला; जिथे तिने अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या वस्तूला नकार दिला, ज्याचे तिला अजूनही खूप वाईट वाटते असे तिने सांगितले.
बुजऱ्या स्वभावामुळे अमिताभ यांनी दिलेली वस्तू नाकारली
प्रीतीने सांगितले, “कॅमेऱ्यासमोर मी नेहमी आत्मविश्वासपूर्ण असायचे, पण कॅमेऱ्याच्या मागे मी खूप लाजाळू आणि अंतर्मुख होते; ते माझ्यासाठी कठीण होते. ‘मोहब्बते’चे शूटिंग फिल्म सिटीमध्ये होत होते आणि खूप थंडी होती. एके दिवशी अमिताभ बच्चन यांनी मला त्यांची शाल दिली आणि म्हणाले की ती शाल अंगावर घे, पण मी घाबरून म्हटलं, ‘नाही नाही, मी हे घेऊ शकत नाही.’ त्यावर यशजी (यश चोप्रा) म्हणाले, ‘अग, अमिताभ बच्चनने मला ती शाल दिली असती तर मी ती घरी नेली असती आणि कधीच परत दिली नसती.’ आजही मला त्याचा खूप पश्चाताप होतो,” असे तिने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
पुढे प्रीतीने सांगितले, “अमिताभ बच्चन हे मनाने अगदी लहान मुलांसारखे आहेत. ते तरुण कलाकारांना नेहमी म्हणायचे, ‘मला म्हाताऱ्यांबरोबर बसवू नका, मला तुमच्याबरोबर बसायला आवडेल; तुमच्या काय गप्पा सुरू आहेत त्या ऐकायला आवडतील.” २००० साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी ‘मोहब्बतें’ हा एक होता. अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या एका कठीण काळानंतर मोठ्या कालावधीनंतर त्यांना एक हिट सिनेमा मिळाला होता.”
‘या’ अभिनेत्याची पत्नी आहे प्रीती झांगियानी
२००८ मध्ये प्रीती झांगियानीने ‘खोसला का घोसला’फेम अभिनेता परवीन डबास बरोबर लग्न केले. लग्नानंतर तिने चित्रपटातून ब्रेक घेतला. २०२३ मध्ये तिने ‘काफस’ या वेब सीरिजमधील प्रभावी भूमिकेसह दमदार पुनरागमन केले.