Virat Kohli & Preity Zinta : सध्या देशभरात आयपीएलच्या अठराव्या हंगामाची जोरदार चर्चा सुरू आहे. २० एप्रिल रोजी IPL चा ३७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज या संघांमध्ये खेळवण्यात आला होता. या सामन्यात विराट कोहलीच्या RCB ने पंजाबला १५७ धावांतच रोखलं आणि ७ विकेट्सनी विजय मिळवला.

मात्र, सोशल मीडियावर सध्या या सामन्यानंतरचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. चंदीगडमध्ये विराट कोहलीला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा अवॉर्ड प्रदान करण्यात आल्यावर हा खास क्षण टिपण्यात आला आहे. या व्हायरल फोटोमध्ये प्रीती झिंटा आणि विराट कोहली मोबाइल फोनमध्ये बघताना, एकत्र हसत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. विराट-प्रीती एकमेकांशी काय बोलत असतील याचा चाहते आतुरतेने विचारत करत होते. अखेर प्रीतीने तिच्या एक्स पोस्टवर स्वत: याबद्दल खुलासा केला आहे.

प्रीती झिंटाने एक्स अकाऊंटवर #PZChat सेगमेंट घेतला. यामध्ये अभिनेत्री तिच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देते. यादरम्यान, प्रीतीच्या एका चाहत्याने तिला याच व्हायरल फोटोबद्दल प्रश्न विचारला.

“विराट कोहली सरांशी तुम्ही काय बोलताय?” या प्रश्नाचं उत्तर देताना प्रीती लिहिते, “आम्ही आमच्या मुलांचे फोटो एकमेकांना दाखवत होतो. आमच्या मुलांबद्दल बोलत होतो, त्यांचे किस्से ऐकून हसत होतो. वेळ कसा निघून जातो ना… १८ वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा विराटला भेटले तेव्हा तो वयाने लहान आणि अगदी नवोदित खेळाडू होता. पण, त्याच्यात तेव्हापासून प्रचंड उत्साह आहे. आजही त्याच्यात सामना जिंकण्यासाठी तिच इच्छाशक्ती असते. तो सर्वांसाठी आयकॉन आहे आणि माणूस म्हणून खूप गोड आणि त्याच्या मुलांचा प्रेमळ बाबा आहे.”

preity zinta and virat
प्रीती झिंटा एक्स पोस्ट

दरम्यान, प्रीतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने जीन गुडइनफशी २०२१ मध्ये लग्न केलं. तिला जय आणि जिया अशी दोन जुळी मुलं आहेत. त्यांचा जन्म सरोगसीद्वारे झाला आहे. तर, भारताचा स्टार क्रिकेटपटू विराटने २०१७ मध्ये अनुष्काशी लग्न केलं. विरुष्काला वामिका आणि अकाय अशी दोन मुलं आहेत.