बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठी अपडेट शेअर करत असते. प्रीतीने नुकतीच गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, याचे काही फोटोज तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
प्रीतीने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री गुवाहाटीमधील कामाख्या मंदिर परिसरात दिसत आहे. यावेळी प्रीतीने गुलाबी रंगाचा पंजाबी सूट परिधान केला असून तिने डोकं ओढणीने झाकलं होतं आणि फेस मास्कही घातला होता. प्रीतीने या क्लिपमध्ये मंदिर, जवळपासची दुकाने आणि तलावाची झलकही दाखवली. व्हिडिओमध्ये, प्रीती कामाख्या मंदिराची मूर्ती एका साधूकडून भेट म्हणून घेताना दिसत आहे.
आणखी वाचा : अल्लू अर्जुनचं ‘पुष्पा २’मधील रौद्ररूप पाहिलंत? फर्स्ट लूक पाहून प्रेक्षकांना आठवला ‘कांतारा’
याबरोबरच प्रीतीने काही सेल्फीजसुद्धा शेअर केले आहेत. व्हिडिओ शेअर करताना प्रीतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “गुवाहाटीला जाण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराला भेट देणे. आमच्या फ्लाइटला बराच उशीर झाला आणि त्यामुळे मी रात्रभर जागी होते. पण जेव्हा मी मंदिरात प्रवेश केला, तेव्हा हे सगळं सार्थकी लागलं असंच वाटलं. या मंदिरात येऊन मनाला शांतता आणि सकरात्मक विचार करायची शक्ति मिळाली. तुमच्यापैकी कुणी गुवाहटीला आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या.”
चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडच्या झगमगटापासून दूर प्रीती तिचा पती जीन गुडइनफसोबत यूएसमध्ये राहते. त्यांनी २९ फेब्रुवारी २०१६ रोजी लॉस एंजेलिसमध्ये लग्न केले. दोघे २०२१ मध्ये जय आणि जिया या जुळ्या मुलांचे पालक झाले. सरोगसीद्वारे मुलांचा जन्म झाल्याची घोषणा करत प्रीतीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.