बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छालच्या लग्नाच्या गेले काही दिवस चर्चा रंगल्या होत्या. आता नुकताच संगीत दिग्दर्शक मिथुन शर्मा याच्याशी तिचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. यांच्या लग्नाच्या मेहेंदी आणि हळदीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर पलकने लग्नातले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोंना तिने “आज आम्ही दोघे कायमचे एकत्र आलो आहोत”, असे कॅप्शन दिले आहे. यांच्या लग्नाचं रिसेप्शनही धूमधडाक्यात पार पडलं. आता त्यांना पंतप्रधान मोदींकडून लग्नाच्या खास शुभेच्छा मिळाल्या आहेत.
मिथुन आणि पलक यांना लग्नाच्या शुभेच्छा देणारं एक पत्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलं. या पात्रातून त्यांनी दोन्ही कुटुंबियांचं अभिनंदन केलं आहे. हे पत्र पलकने सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. हे पत्र शेअर करत मिथुन आणि पलकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत.
पलक आणि मिथुन यांनी हे पत्र शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “आदरणीय मोदीजी, तुम्ही पत्राच्या मार्फत दिलेले आशीर्वाद आमच्या हृदयाला भिडले आहेत. या आदर आणि प्रेमाबद्दल आम्ही तुमचे खूप आभार. आमच्या लग्नाला तुमचे शुभाशीर्वाद मिळाले हे आमचं भाग्य आहे.” नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा मिळाल्याने पलक आणि मिथुन दोघेही भारावले आहेत.
हेही वाचा : Photos: पलक मुच्छाल आणि मिथुन शर्मा यांचा राजेशाही विवाहसोहळा संपन्न, पहा फोटो
६ नोव्हेंबर रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधली. जवळचा मित्र परिवार आणि कुटुंबीय यांच्या उपस्थितीत यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. तर यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. जावेद अली आणि यास्मीन अली, सोनू निगम, कैलाश खेर, रुप कुमार राठोड, कल्याणजी शाह आणि त्यांच्या पत्नी शांताबेन शाह, गीतकार मनोज मुंतशिर, स्मृती मंधाना, रुबीना दिलैक आशी अनेक मंडळी पलक आणि मिथुनच्या रिसेप्शनला उपस्थित होती.