‘फॅमिली मॅन’ फेम अभिनेत्री प्रियामणीला २०१६ मध्ये तिचा प्रियकर मुस्तफा राजबरोबरच्या साखरपुड्याची घोषणा केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले होते. या दोघांची भेट बंगळुरूमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात झाली होती. परंतु, या दोघांचे धर्म वेगळे असल्यामुळे प्रियामणीने साखरपुड्याची घोषणा केल्यावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. काही लोकांनी तर त्यांच्या मुलांना ‘दहशतवादी’ म्हटले जाईल असेही वक्तव्य केले. ही नकारात्मकता त्यांच्या २०१७ मध्ये झालेल्या लग्नानंतरही कायम राहिली. अलीकडेच एका मुलाखतीत प्रियामणीने सांगितले की तिला अजूनही ट्रोलिंगला सामोरे जावे लागते आणि लोक आजही तिच्या धार्मिक श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
साखरपुड्याच्या घोषणेनंतरचा धक्कादायक अनुभव
फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत, प्रियामणीने साखरपुड्याच्या घोषणेनंतर तिचावर झालेल्या कठोर टीकेबद्दल सांगितले. ‘फॅमिली मॅन’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रियामणीने सांगितले की, तिने कुटुंबाच्या संमतीने फेसबुकवर साखरपुड्याची घोषणा केली होती आणि त्यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. “लोक मला मेसेज करत होते आणि लिहित होते, ‘जिहाद, मुस्लीम, तुझी मुलं दहशतवादी होतील,’” असा धक्कादायक अनुभव प्रियामणीने शेअर केला.
भावनात्मक परिणाम आणि संघर्ष
प्रियामणीने मान्य केले की या अनुभवाचा तिच्यावर मोठा परिणाम झाला होता. ती म्हणाली, “हे खूप निराशाजनक आहे. एका आंतरधर्मीय जोडप्याला असे लक्ष्य का करायचे? अनेक मोठे अभिनेते आहेत, ज्यांनी त्यांच्या जाती किंवा धर्माबाहेर लग्न केले आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी तो धर्म स्वीकारला आहे. ते फक्त धर्माचा विचार न करता त्या व्यक्तीच्या प्रेमात पडले आहेत. मला हे नकारात्मक वातावरण का आहे हे अजिबात समजत नाही.”
धर्माच्या संदर्भात ट्रोलिंगचा अनुभव
प्रियामणीने अलीकडच्या काळात घडलेली एक घटना सांगितली, जिथे तिने ईदबद्दल पोस्ट केल्यानंतर एका व्यक्तीने तिच्यावर इस्लाम स्वीकारल्याचा आरोप केला. ती म्हणाली, “तुम्हाला कसे माहीत की मी धर्मांतर केले आहे? हा माझा वैयक्तिक निर्णय आहे.” तिने स्पष्ट केले की, लग्नाच्या आधीच तिने मुस्तफाला सांगितले होते की ती धर्मांतर करणार नाही. “मी जन्मतः हिंदू आहे आणि मी माझ्या धर्माचे पालन करत राहीन,” असे तिने ठामपणे सांगितले. तसेच दोघेही एकमेकांच्या श्रद्धांचा आणि धर्मांचा सन्मान करतात असे तिने सांगितले.
हेही वाचा…पुन्हा प्रदर्शित झालेल्या ‘तुंबाड’चा जलवा! तीन आठवड्यात कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
नकारात्मकतेला प्रतिसाद न देण्याचा निर्णय
ईदच्या पोस्टवर मिळालेल्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना प्रियामणी म्हणाली, “लोकांनी विचारले की मी नवरात्रोत्सवाबद्दल पोस्ट का केली नाही. त्यावेळी मला काय उत्तर द्यावे ते कळत नव्हते, पण आता या गोष्टींनी मला काही फरक पडत नाही. मी अशा नकारात्मकतेकडे लक्ष न देण्याचा निर्णय घेतला आहे.” प्रियामणी नुकतीच ‘आर्टिकल ३७०’ या सिनेमात दिसली होती आणि ती लवकरच ‘फॅमिली मॅन ३’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.