प्रियांका चोप्रा एस.एस. राजामौली यांच्या ‘SSMB29’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात महेश बाबू मुख्य भूमिकेत आहे. प्रियांका चोप्रा, एस. एस. एस राजामौली आणि महेश बाबू हे दिग्गज एकत्र काम करणार असल्याने या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. बॉलीवूडची देसी गर्ल ‘स्काय इज पिंक’ या २०१९ साली आलेल्या हिंदी चित्रपटात शेवटची दिसली होती. गेली ५ वर्षे ती कुठल्याही हिंदी किंवा भारतीय सिनेमात दिसली नव्हती.
प्रियांका चोप्रा ‘SSMB29’ या साउथच्या चित्रपटातून भारतीय सिनेमात पुनरागमन करत आहे. मधल्या काळात ती केवळ हॉलीवूड चित्रपटात दिसली. ती अनेक वर्षानंतर भारतीय सिनेमात एका मोठ्या दिग्दर्शक आणि सुपरस्टार अभिनेत्याबरोबर पुनरागमन करत असली तरी यापेक्षा जास्त प्रियांकाने या सिनेमासाठी घेतलेल्या मानधनाची चर्चा रंगत आहे.
Koimoi च्या रिपोर्टनुसार, प्रियांकाने तब्बल ३० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या मानधनामुळे ती एस.एस. राजामौली यांनी आतापर्यंत काम केलेल्या सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक ठरली आहे. इतकेच नव्हे, तर ‘बाजीराव मस्तानी’ फेम प्रियांकाने RRR साठी आलिया भट्टने घेतलेले ९ कोटी रुपये आणि ‘बाहुबली’साठी अनुष्का शेट्टीने घेतलेले ५ कोटी रुपये यांना मोठ्या फरकाने मागे टाकले आहे. असे असले तरी अद्याप चित्रपटाशी संबंधित कोणत्याही अधिकृत स्रोतांकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.
दरम्यान, ‘SSMB29’ च्या शूटिंगला हैदराबादच्या अल्यूमिनियम फॅक्टरी येथे सुरूवात झाली असून, महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा दोघेही चित्रीकरणासाठी हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रीकरणादरम्यान कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी एस.एस. राजामौली यांनी संपूर्ण टीमला एक गोपनीयता करार (NDA) साइन करण्यास सांगितले आहे, ज्यामुळे शूटिंग दरम्यान कलाकारांसह सेटवरील कुठल्याही व्यक्तीला मोबाईल फोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
अहवालांनुसार, SSMB29 च्या टीमचे पुढील शूटिंग केनियाच्या जंगलांमध्ये होणार आहे, जिथे काही महत्त्वाची दृश्ये चित्रित केली जाणार आहेत. Pinkvilla च्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल, पहिला भाग २०२७ मध्ये आणि दुसरा भाग २०२९ मध्ये रिलीज केला जाणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd